

निनाद देशमुख
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मयूर कॉलनी-कोथरूड हा प्रभाग (क्र. 31) भाजपचा बालेकिल्ला असून, या भागात पक्षाचे अनेक मातब्बर नेते आहेत. गेल्या काळात या प्रभागाचा विकास झाला असला, तरी गेल्या काही वर्षांत विविध समस्या देखील वाढल्या आहेत. या प्रभागात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. तसेच रस्त्यांचा विकास, तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव आहे. जुन्या इमारतींचा पुनर्विकास आदी प्रश्न ‘जैसे थे’ असून, याबाबत प्रशासनाचे धोरण निश्चित होणार कधी, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मी माझ्या कार्यकाळात प्रभागातील विविध विकासकामे केली आहेत. खासदार, महापौर आणि नगरसेवक निधीतून ही कामे पूर्ण केली आहेत. प्रभागात जलवाहिन्या, ड्रेनेज लाइन, पदपथांची दुरूस्ती आणि सुशोभीकरण आदी विकासकामे करण्यात आली आहेत. सुतार दवाखान्यात अत्याधुनिक चाचणी केंद्र (लॅब) आणि प्रसूतिगृहात यंत्रसामुग््राी उपलब्ध केली. थोरात उद्यानात डायनासोर पार्क आणि खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिले.
हर्षाली माथवड, नगरसेविका
पुणे शहरातील विकसित म्हणून या प्रभागाची ओळख आहे. या प्रभागातून 2017 च्या महापालिका निवडणुकीत भापजकडून माजी महापौर आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह हर्षाली माथवड, वासंती जाधव हे निवडून आले होते, तर शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार हे देखील विजयी झाले होते. हा प्रभाग भाजपचा गड मानला जातो. या प्रभागातून निवडून येऊन मुरलीधर मोहोळ हे महापौर होऊन देखील या भागातील काही प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. या प्रभागात बंगले, झोपडपट्ट्या, बैठी घरे आणि गृहनिर्माण संस्थांमधील रहिवासी आहेत. गेल्या काळात सर्व नागरिकांच्या समस्या डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन नगरसेवकांनी कामे करणे अपेक्षित होते. मात्र तसे झालेले दिसत नाही. वाहतूक कोंडी, अतिक्रमणे, पर्यायी रस्ते, विकास आराखड्यातील रखडलेले रस्ते आदी प्रश्न आजही कायम आहेत.
प्रभागातील पाणीपुरवठा, वीज, रस्ते आदींचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर भर दिला. नागरिकांना चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी आझादनगर येथे अत्याधुनिक डायग्नोस्टिक सेंटर उभारून नागरिकांना कमी दरात विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. महापालिकेच्या शाळांची दुरुस्ती केली. रेशन कार्ड, शहरी गरीब यासह केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले.
वासंती जाधव, नगरसेविका
या प्रभागातील अनेक जुन्या इमारतींचा पुनर्विकास होणे गरजेचे आहे. यातील काही इमारती पाडून नव्याने टोलेजंग इमारती उभ्या केल्या जात आहेत. दिवस-रात्र या इमारतींची कामे सुरू असल्याने परिसरातील नागरिकांना या बांधकामांचा त्रास सहन करावा लागत आहे. बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची या भागातील रस्त्यांवर वर्दळ असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीत भर पडत आहे, यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
प्रभागातील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. हा प्रभाग शहरातील ’कचरा कंटेनरमुक्त’ होणारा पहिला प्रभाग ठरला आहे. सर्व भागांत पाण्याचा सुरळीत पुरवठा होत आहे. सुतार दवाखाना अद्ययावत करण्यात आला असून, या ठिकाणी सर्व प्रकारच्या चाचण्या माफक दरात केल्या जात आहेत. डहाणूकर कॉलनीत बाळासाहेब ठाकरे उद्यानाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. काही ’मिसिंग लिंक’ची कामे पूर्ण करण्यात आली आहेत, तर काही प्रगतिपथावर आहेत.
मुरलीधर मोहोळ, माजी महापौर तथा केंद्रीय राज्यमंत्री
मुख्य रस्त्यांच्या पदपथांवर अनधिकृत टपऱ्या उभारण्यात आल्या आहेत. तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील थाटले आहेत. या ठिकाणी रात्रीच्या वेळी तरुणांची आणि नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. यामुळे पदपथांवरून चालण्यासाठी नागरिकांना जागाच उरत नाही. तसेच रस्त्यांवरच वाहनांचे अनधिकृत पार्किंग केले जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे, याकडे स्थानिक राज्यकर्ते आणि पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अनेक जागा ताब्यात घेऊन अरुंद रस्त्यांचे रूंदीकरण करण्यात आले आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठी ड्रेनेज लाइनची कामे करण्यात आली आहेत, यासह प्रभागात विविध विकासकामे करण्यात आली आहेत. कोरोना काळात नागरिकांसाठी लसीकरण केंद्र उभारण्यात आले होते.
पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक
प्रभागात या भागांचा समावेश
मयूर कॉलनी, आयडीयल कॉलनी, भेलकेनगर, डहाणूकर कॉलनी, गुजराथ कॉलनी, गुरुराज सोसायटी, सुतार दवाखाना, कोथरूड गावठाण, वनाज कंपनी, कृष्णा हॉस्पिटल, मृत्युंजय कॉलनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, कमिन्स इंडिया लि. गांधी भवन, गोपीनाथनगर, महेश विद्यालय, शास्त्रीनगर (पार्ट), गुरुजन सोसायटी, आझादनगर थोरात उद्यान, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आदी.
डहाणूकर कॉलनीतील गल्ली क्रमांक नऊच्या मागे मोकळी जागा आहे. झोपडपट्टीतील नागरिकांकडून या ठिकाणी अस्वच्छता केली जात आहे. या झोपडपट्टीत सार्वजनिक स्वच्छतागृहे असूनही त्याचा वापर होत नाही. परिणामी अस्वच्छतेचा त्रास परिसरातील रहिवाशांना होत आहे.
संजय काळे, रहिवासी
प्रभागातील प्रमुख समस्या
वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर
‘मिसिंग लिंक’च्या जागा महापालिकेच्या ताब्यात नाहीत
या भागात महापालिकेचे एकही खेळाचे मैदान नाही
इमारतींच्या पुनर्विकासाबाबत ठोस धोरणाचा अभाव
गुजराथी कॉलनी येथील रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले
विकास आराखड्यातील आरक्षणे, ॲमेनिटी स्पेसचा लाभ होईना
प्रभागात झालेली विकासकामे
सुतार दवाखान्यात अत्याधुनिक लॅब आणि प्रसूतिगृहात मशिनरी
छत्रपती संभाजी विद्यालयाचे नूतनीकरण आणि अद्ययावत प्रयोगशाळा
डहाणूकर कॉलनीत बाळासाहेब ठाकरे उद्यानाचे काम पूर्ण
गावठाण आणि वस्ती भागातील विद्युत वाहिन्या केल्या भूमिगत
जुन्या ड्रेनेज लाइन काढून मोठ्या व्यासाच्या वाहिन्या टाकल्या
विविध रस्त्यांवर पदपथांचे निर्मितीचे काम केले पूर्ण
वाहतूक कोंडी ही या प्रभागातील प्रमुख समस्या आहे. पौड रस्ता आणि कर्वे रस्त्यावर दररोज सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना होणे अपेक्षित आहे. तसेच परिसरातील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत आहे.
प्रज्ञा कांबळे, रहिवासी