बोगस सातबारा करून १३ एकर सरकार जमिनीचे वाटप; शासनाला करोडोंचा चुना | पुढारी

बोगस सातबारा करून १३ एकर सरकार जमिनीचे वाटप; शासनाला करोडोंचा चुना

केडगाव; पुढारी वृत्तसेवा : सरकारी मालकीच्या १३ एकरांहून अधिकच्या जमिनीवर बोगस खातेदाराचे नाव लावून काेट्यवधी रुपयांची जमीन लाटण्याचा प्रकार दौंड तालुक्यातील वाखारी गावात घडला आहे. दशरथ मोरू शेंडगे (रा. पंतनगर, कोंढवा, पुणे) हे नाव लावण्यात आले आहे. परंतु, या नावाची व्यक्ती आणि पंतनगर हे दोन्ही अस्तित्वातच नसल्याची मोठी चर्चा आहे.

सरकारी जमिनीवरील हा एक प्रकारचा दरोडा असून, हा उद्योग नक्की कुणाच्या मदतीने, आशीर्वादाने केला गेला, हा शोधमोहिमेचा भाग आहे. महसूल विभाग याबाबत गप्प कसा, हाच मोठा यक्षप्रश्न म्हणावा लागेल. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. आता प्रकरणाचे काय होणार, याची वादळी चर्चा परिसरात आहे.

वाखारी गावातील गझला फार्म भागातील जुना सर्व्हे नंबर ८२, सध्याचा गट नंबर २२० मध्ये खातेदार माधव शंकर अवचट होते. १९७८ साली शेतजमिनी धारणा कायदा (सीलिंग कायदा) आल्याने ही जमीन त्यामध्ये आल्याने ती सरकारजमा होऊन कायद्यानुसार या जमिनीचे वाटप सरकारच्या माध्यमातून काही नागरिकांना केले गेले. सरकार जमीन वाटप फेरफार क्रमांक २७५ ने तीन हिस्से करून मल्हार गंगाराम चोरमले यांना ५ एकर १० गुंठे क्षेत्र हे हिस्सा क्रमांक १ नुसार देण्यात आले. हिस्सा क्रमांक २ साठी बबन शिवराम गडधे यांना १४ एकर आणि ३ साठी खंडू शिवराम गडधे यांना १४ एकर २९ गुंठे क्षेत्र देण्यात आले आहे.

येथून पुढे लबाडीचा खेळ सुरू झाला आहे. या जमिनीत सन २००० मध्ये ४ हिस्सा तयार केला गेला असून, त्यासाठी कोणताही फेरफार तसेच सरकारी आदेश केला गेलेला नाही. या बोगस हिस्सा ४ साठी दशरथ मोरू शेंडगे यांच्या नावावर १३ एकरांहून अधिक क्षेत्राची नोंद केलेली दिसून आली असून, शेंडगे यांनी २२ डिसेंबर २०२१ ला सदर जमीन केडगाव येथील दस्तनोंदणी कार्यालयात दस्त क्रमांक ८७२४/२०२१ ने नोंदणी केली आहे.

मूळ असलेल्या सरकारी वाटपपत्रात मल्हार गंगाराम चोरमले, बबन शिवराम गडधे, खंडू शिवराम गडधे या तीन व्यक्तींची नावे मालकी असताना चौथा हिस्सा वाटप प्रकार हा बेकायदा, बोगसरीत्या तयार झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

वाखरी गावात अनेक नागरिकांना सीलिंग कायद्याच्या अनुषंगाने जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. काही जमिनींचे साठेखत, तर काहींचे खरेदीखतही केले गेले आहे. काही ठिकाणी बोगस खातेदार उभे करून त्याचा मालकी हक्क आपल्याकडे ठेवण्याचा प्रकारही झाला आहे, अशी चर्चा हे प्रकरण उघड पडल्याने सुरू झाली आहे.

हा सातबारा बोगस तयार झाला असून, तो रद्द करणार आहे.

– किशोर परदेशी,
-मंडलाधिकारी

या प्रकरणाची सर्व प्रकारे चौकशी करण्यात येईल आणि चुकीचे काम करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील.
– संजय पाटील,
-दौंड तहसीलदार

दफ्तरतपासणीची गरज

यापूर्वी देखील सीलिंग जमिनीबाबत वाखारी याच महसुली गावच्या हद्दीत असा प्रकार घडला आहे. या महसुली गावची दफ्तरतपासणी करण्याची गरज आहे, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.

हेही वाचलत का?

Back to top button