सांगली जिल्ह्यात गव्यानंतर आता बिबट्याचा थरार ! दुचाकीस्वारावर हल्ल्याचा बिबट्याकडून प्रयत्न | पुढारी

सांगली जिल्ह्यात गव्यानंतर आता बिबट्याचा थरार ! दुचाकीस्वारावर हल्ल्याचा बिबट्याकडून प्रयत्न

नेर्ले : पुढारी वृत्तसेवा

नेर्ले- कापुसखेड (ता.वाळवा ) रस्त्यावर काल (गुरुवार) रात्री मोटरसायकल वरून जाणाऱ्या व्यक्‍तीवर बिबट्याने हल्याचा प्रयत्न केला. मात्र, मोटारसायकल चालकाने मोटारसायकलचा वेग वाढवल्याने अनर्थ टळला. त्यानंतर कापुसखेडच्या युवकांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

गुरुवारी रात्री कापुसखेड येथील महाविद्यालयीन तरुण अनिकेत पाटील आणि त्याची बहीण मोटारसायकल वरून नेर्ले येथे पाहुण्यांकडे गेले होते. रात्री ९.३० वाजता मोटारसायकलवरून कापुसखेडकडे जात असतताना नेर्ले येथील कदम वस्तीनजीक ऊसातून आलेल्या बिबट्याने मोटारसायकल वरती झेप घेतली. अनिकेतने प्रसंगावधान राखत मोटारसायकलचा वेग वाढवला. मात्र तरीही बिबट्याने १०० ते १५० मीटर मोटारसायकलचा पाठलाग केला.

त्याचवेळी कासेगाव येथील तिघेजण दोन मोटारसायकल वरून कापुसखेड कडून नेर्लेकडे जात होते. त्यावेळी बिबट्याने त्यांच्या मोटारसायकलचाही पाठलाग केला. यावेळी तिघांनी आरडाओरडा केल्‍यामुळे बिबट्याने नजिकच्या उसात धूम ठोकली. या प्रकाराने तिघेही घाबरले होते. नेर्ले गावात आल्यावर त्यांनी ही माहिती ग्रामस्थांना दिली.

दरम्यान कापुसखेड येथील युवकांना याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी येऊन युवकांनी बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कापूसखेड ग्रामपंचायतिच्या वतीने गावात दवंडी देण्यात आली आहे. ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी कापुसखेड-नेर्ले दरम्यान मोटारसायकल वरून प्रवास करू नये, प्रवासा दरम्यान सतर्कता बाळगण्याच्या सूचना ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आल्याचे सरपंच मंदाताई धुमाळे यांनी सांगितले.

गेल्या दीड-दोन महिन्यापासून बिबट्याने नेर्ले-कापुसखेड शिवेवर धुमाकूळ घातला आहे. मरीग, डेसकत, ओढा परिसरातील वस्त्यांवरील कुत्री त्याने फस्त केली आहेत. रात्रीच्या वेळी कापुसखेड-नेर्ले रस्त्यावर बिबट्या वारंवार दिसत आहे. त्यामुळे शेतकरी, प्रवाशी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. आता, बिबट्याने मोटारसायकल वरून जाणाऱ्यांना लक्ष केल्याने रात्रीच्या वेळी प्रवास करणे धोकादायक बनले आहे.

हे ही वाचा :

Back to top button