सिंधुताई सपकाळ : अनाथांवरील मायेची सावली हरपली…

ममताबल सदनातील चिमुकल्यांसमवेत आनंदाचे क्षण घालवताना सिंधुताई
ममताबल सदनातील चिमुकल्यांसमवेत आनंदाचे क्षण घालवताना सिंधुताई
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

अनाथांची आई म्हणजे सिंधुताई सपकाळ. अतिशय खडतर आणि प्रेरणादायी आयुष्य जगणार्‍या या माऊलींच्या मृत्यूची बातमी कळताच महाराष्ट्राचे समाजमानस हादरून गेले. हजारो अनाथांच्या डोक्यावरील मायेची सावली हरपल्याच्या भावना समाजातील सर्व स्तरांतून व्यक्‍त झाल्या.

राष्टृपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सिंधुताई सपकाळ यांना नुकतेच पद्मश्री या पुरस्कारांने गौरवण्यात आले होते.
राष्टृपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सिंधुताई सपकाळ यांना नुकतेच पद्मश्री या पुरस्कारांने गौरवण्यात आले होते.

सिंधुताईंना लोक प्रेमाने माई म्हणत. माई मूळच्या विदर्भातल्या. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बालसदन संस्थेची स्थापना केली. 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरू झाली.

आपली मुलगी ममता यांना दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक- युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे 1050 मुले या संस्थेत राहिलेली आहेत.

वर्धा जिल्ह्यातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे सांभाळण्याचे काम करायचे. नवरगाव हे अतिशय मागासलेले, शहरी सुविधांचा स्पर्श नसलेले, कुणालाही शिक्षणाचा गंध नसलेले गाव, अशा परिस्थितीत अभिमान साठे पिंपरी गावात आले. चिंधी म्हणजेच सिंधुताई ही त्यांची सर्वांत मोठी मुलगी. सिंधुताईंना एक भाऊ आणि एक बहीण आहे. मुलीने शिकावे अशी त्यांच्या वडिलांची खूप इच्छा होती; पण आईचा मात्र सक्‍त विरोध होता म्हणून माईंना गुरे राखायला पाठवले जात असे. काही दिवसांनी अल्पवयातच सिंधुताईंचे लग्‍न झाले. स्वत:च्या संसाराची पर्वा न करता सिंधुताई अनाथांची आई झाल्या आणि आयुष्यभर त्या या मुलांसाठी झिजत राहिल्या.

तब्बल 750 पुरस्कार

महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार (2012), पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार (2012), महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार (2010), मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (2013), आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (1996), सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार, राजाई पुरस्कार, शिवलीला महिला गौरव पुरस्कार, श्रीरामपूर-अहमदनगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासतर्फे कै. सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृत्यर्थ दिला जाणारा सामाजिक सहयोगी पुरस्कार (1992), सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाऊंडेशनने दिलेला रिअल हिरो पुरस्कार (2012), 2008 – दैनिक लोकसत्ताचा 'सह्याद्रीची हिरकणी' पुरस्कार, प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (2015), डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (2017), पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार.

परदेशातून निधी जमविला

सिंधुताई यांनी आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने परदेश दौरे केले. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी आपल्या बोलण्याने आणि काव्याने समाजाला प्रभावित केले. परदेशी अनुदान मिळणे सोपे जावे या हेतूने त्यांनी मदर ग्लोबल फाऊंडेशन संस्थेची स्थापना केली आहे.

सिंधुताई यांनी स्थापन केलेल्या संस्था

बालनिकेतन हडपसर, पुणे, सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, चिखलदरा, अभिमान बालभवन, वर्धा, गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा (गोपालन), ममता बालसदन, सासवड, सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था,

कुंभारवळणाच्या आश्रमातील मुला-मुलींनी फोडला टाहहो

पारगाव मेमाणे/सासवड : पुढारी वृत्तसेवा

अनाथांची आई म्हणजे सिंधुताई सपकाळ. अतिशय खडतर आणि प्रेरणादायी आयुष्य जगणार्‍या या माऊलींच्या मृत्यूची बातमी कळताच कुंभारवळण (ता. पुरंदर) येथील ममता बाल सदनमध्ये एकच टाहो फुटला. पुरंदरचे आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार अशोक टेकवडे, अजिंक्य टेकवडे आदींनी शोक व्यक्‍त केला.

सिंधुताई सपकाळ यांंचे मंगळवारी (दि. 4) रात्री 8.10 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. महिनाभरापूर्वीच त्यांचे फुफ्फुसाजवळचा हार्निया ही गंभीर शस्त्रक्रिया झाली होती. त्यांनी हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला होता. सिंधुताईंनी 1994 साली कुंभारवळण येथे ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती.

आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. वर्धा जिल्ह्यातील पिंपरी या गावात अभिमान साठे यांच्या पोटी 14 नोव्हेंबर 1948 रोजी सिंधुताईंचा जन्म झाला होता. वयाच्या 10 व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. वयाच्या 20 व्या वर्षी चौथ्यांदा आई. पुन्हा मुलगीच झाल्याने घर सोडावे लागले. सासवडजवळील कुंभारवळण येथे अनाथाश्रम सुरू केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news