अनाथांची माय ‘अनाथ’ करून गेली; सिंधुताई सपकाळ काळाच्या पडद्याआड, पुण्यात घेतला अखेरचा श्वास | पुढारी

अनाथांची माय 'अनाथ' करून गेली; सिंधुताई सपकाळ काळाच्या पडद्याआड, पुण्यात घेतला अखेरचा श्वास

पुणे; पुढारी ऑनलाईन

अनाथांसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले. पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. महिन्यापूर्वीच सिंधुताईंवर हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गेल्यावर्षी पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

सिंधूताई सपकाळ यांचा जन्म १४ नोंव्हेंबर १९४७ रोजी वर्धा येथे झाला होता. महिन्याभरापूर्वी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज अखेर पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हजारो अनाथ मुला-मुलींना आश्रय देत अनाथांची माय म्हणून त्या परिचित होत्या. त्यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महिलांच्या अन्याय- अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात केली होती.

सिंधुताईंनी आपले संपूर्ण आयुष्य अनाथांसाठी समर्पित केले. म्हणूनच त्यांना अनाथांची आई म्हटले जात असे. त्यांनी हजारो अनाथ मुले दत्तक घेतली आहेत. आज त्यांच्या कुटुंबात २०७ जावई आणि ३६ सूना आहेत. १ हजारपेक्षा जास्त नातवंडे आहेत. त्यांची स्वतःची मुलगी वकील आहे आणि त्यांनी दत्तक घेतलेली अनेक मुलं आज डॉक्टर, इंजिनीअर, वकील आहेत आणि त्यापैकी अनेक स्वतःचे अनाथाश्रम देखील चालवतात.

सिंधुताईंना शेकडो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात “अहिल्याबाई होळकर” पुरस्काराचा समावेश आहे, जो महाराष्ट्र शासनाकडून महिला आणि बालकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना दिला जातो. पुणे, वर्धा, सासवड येथे त्यांचे अनाथालय आहे. २०१० मध्ये सिंधुताईंच्या जीवनावर आधारित “मी सिंधुताई सपकाळ” हा मराठी चित्रपट तयार करण्यात आला, ज्याची ५४ व्या लंडन चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली.

Back to top button