…म्हणून पडला माशांचा पाऊस! | पुढारी

...म्हणून पडला माशांचा पाऊस!

वॉशिंग्टन : अमेरिकेत पूर्व टेक्सासच्या टेक्सरकाना शहरात आलेल्या वादळावेळी चक्क माशांचा पाऊस पडला. आकाशातून गारा पडाव्यात किंवा हिमवृष्टी व्हावी तशी ही माशांची वृष्टी झाली आणि सगळेच थक्क झाले. रस्त्यावर सर्वत्र मासेच मासे पडलेले होते. हा प्रकार कसा घडला हे आता वैज्ञानिकांनी स्पष्ट करून सांगितले आहे.

या प्रकाराला विज्ञानातही ‘अ‍ॅनिमल रेन’ असेच म्हटले जाते. त्याचा अर्थ असा की आकाशातून सजीवांचे खाली पडणे. ज्यावेळी काही भागात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होते त्यावेळी अशा घटना घडतात. इंग्रजीत याला ‘वॉटर स्प्राउटस्’ असेही म्हटले जाते. ज्यावेळी चक्रीवादळ निर्माण होते त्यावेळी ते समुद्रातील पाण्याबरोबरच त्यामधील लहान वनस्पती आणि प्राणीही आपल्यासमवेत ओढून नेते. चक्रीवादळाचा वेग वाढल्यानंतर समुद्रातील जीव त्याच्या विळख्यात सापडतात. त्यानंतर हे चक्रीवादळ जमिनीकडे खेचले जाते.

चक्रीवादळाचा वेग कमी झाल्यानंतर त्यामध्ये सापडलेले जीव हळूहळू जमिनीवर पडू लागतात. त्यामुळे असे वाटते की जणू काही आकाशातूनच प्राण्यांचा पाऊस पडत आहे! टेक्सरकाना शहरात सहा ते सात इंच आकाराचे मासे सर्वत्र पडले होते. लोकांनी हे मासे घरी नेऊन त्यावर मस्त ताव मारला!

Back to top button