सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर : आरोग्य उपाययोजनेसाठी शासनाकडून ८ कोटी | पुढारी

सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर : आरोग्य उपाययोजनेसाठी शासनाकडून ८ कोटी

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसह ओमायक्रॉनची साथ रोखण्यासाठी नव्याने 8 कोटी रुपयांचा निधी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे. या निधीतून ओमायक्रॉन तपासणी कीट, आयसीयू बेड वाढविणे, ऑक्सिजनचे आणखी दोन प्लांट वाढविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

ते म्हणाले, कोरोनापाठोपाठ ओमायक्रॉनचाही धोका वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने सज्ज राहावे, अशा सूचना शासनाच्या वतीने नुकत्याच देण्यात आल्या आहेत. त्यासाठी लागणारा निधीही शासनाने दिला आहे. त्या निधीमधून उपाययोजना सुरू केल्या आहेत. यामध्ये पंढरपूर व अक्कलकोट येथे नव्याने 80 आयसीयूचे बेड वाढविण्यात येणार आहेत. कोरोनासाठी पुन्हा नव्याने आरटी-पीसीआर लॅब उभारण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, नवा व्हेरियंट ओमायक्रॉन संसर्गाच्या तपासणीसाठी जवळपास तीन हजार तपासणी किट खरेदी करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील कुर्डूवाडी आणि शेटफळ येथे नव्याने ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यात 310 मेट्रिक टन ऑक्सिजन साठा करण्याची क्षमता आहे.

त्यामुळे 190 मेट्रिक टनाचा साठा विविध शासकीय रुग्णालयामध्ये करण्यात येणार आहे. आणखी 80 ते 90 मेट्रिक टन साठा विविध डिलर आणि भरून देणार्‍या खासगी लोकांकडे होणार आहे. उर्वरित साठा खासगी रुग्णालयात करण्यात येणार आहे. नव्याने उभारण्यात आलेले ऑक्सिजन प्लांट पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यात येणार आहे.

ते म्हणाले, याच धर्तीवर जिल्ह्यात 15 ते 18 या वयोगटातील मुलांना सोमवारपासून लसीकरण करण्याचे काम जिल्ह्यात सुरु आहे. काल 5200 मुलांना तर आज 5000 मुलांना ही लस देण्यात आली आहे. जिल्ह्यात लवकरच हे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.

Back to top button