ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी रस्ता गजबजला; शुभेच्छांचे वर्षाव | पुढारी

ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी रस्ता गजबजला; शुभेच्छांचे वर्षाव

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रंगीबेरंगी फुगे… आकर्षक विद्युत रोषणाई… तरुणाईची रेलचेल… सांताक्लॉजसोबत लहानग्यांचा किलबिलाट… शुभेच्छांचे वर्षाव… आणि सेल्फीची क्रेझ, अशा जल्लोषपूर्ण वातावरणाने ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी रस्ता गजबजला.

एकमेकांना शुभेच्छा देत तरुणाईने ख्रिसमस सणाचा आनंद लुटला. दरम्यान गेल्यावर्षीपेक्षा यंदा या परिसरात कोरोनामुळे कमीच गर्दी पाहायला मिळाली. याठिकाणी येणाऱ्या सर्वच नागरिकांनी मास्क परिधान केले होते. तर रात्री नऊ नंतर पोलिसांनी तरुणाई आणि फुगे विक्रेत्यांची हकालपट्टी सुरू केली. त्यामुळे काही काळ शुकशुकाट पहायला मिळाला. मात्र, पोलिस गेल्यावर तरूणाई पुन्हा रस्त्यावर आली.

शहरावर करोनाचे सावट असले तरी शुक्रवारी ख्रिस्त बांधवांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करत नाताळ सणाचे जल्लोषात स्वागत केले. ‘मेरी ख्रिसमस’ म्हणत एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. कॅम्प परिसरात ख्रिस्त बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. येथे चर्चचे प्रमाणही जास्त आहे. कँम्प परिसरात असणाऱ्या अनेक चर्चमध्ये नाताळच्या पूर्वसंध्येला प्रार्थना करण्यात आली. ख्रिस्त बांधवांच्या आदराचे प्रतीक असलेल्या नाताळ सणाने शहराचे वातावरण प्रसन्न झाले होते. या प्रसन्न वातावरणात शुक्रवारी तरुणाई सायंकाळच्या सुमारास एम.जी रोडवर उतरली. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Back to top button