

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बँकेची फसवणूक करणा-या एकाच्या बारामतीत पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
बँकेची सुमारे 18 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात एकाला बारामतीत अटक करण्यात आली.
योगेश अजित काटे (रा. काटेवाडी, ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे.
योगेश हा मध्य प्रदेशमधून पसार झाला होता. तो बारामती तालुका पोलिसांच्या मदतीने मध्यप्रदेश पोलिसांना जाळ्यात सापडला.
भोपाळच्या दिलीप बिल्डकॉन लिमिटेड या कंपनीचे पंजाब नॅशनल बँकेचे 18 कोटी 50 लाख रुपयांचे धनादेस क्लोनिंग करून हे धनादेश
आयडीबीआय बँकेच्या शाखा व्यवस्थापकाच्या मदतीने ओडीसा येथील एका इसमाच्या करंट खात्यावर टाकून फसवणूकीचा प्रकार घडला होता.
या प्रकरणी मध्यप्रदेशातील भोपाळ येथे स्पेशल टास्क फोर्स येथे फसवणूक व अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल होता.
या प्रकरणात मध्यप्रदेश सरकारने यापूर्वीच आय़डीबीआय बॅंकेचा शाखा व्यवस्थापक सरोज महापात्रा याला अटक केली होती.
या गुन्ह्यात काटे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याच्या शोधासाठी एसटीएफ भोपाळचे तपास पथक बारामतीत दाखल झाले होते.
त्यांनी तालुका पोलिस ठाण्याच्या मदतीने काटे याचा शोध घेत त्याला अटक केली.
पोलिस निरीक्षक महेश ढवाण, सपोनि प्रमोद पोरे व कर्मचा-यांनी तांत्रिक बाबींच्या आधारे योगेश काटे याला बारामतीत मोरगाव रस्त्यावरून ताब्यात घेत त्याला स्पेशल टास्क फोर्स भोपाळ यांच्या ताब्यात दिले.