

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी अद्याप कोणत्याही प्रकारचा क्लोजर रिपोर्ट सादर केला नाही. मात्र सुरुवातीपासूनच पुजा चव्हाण च्या आई-वडिलांनी आमची कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचा जबाब नोंदविला आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी देतानाच क्लोजर रिपोर्ट सादर केलेल्या अफवांना पुर्णविराम दिला आहे.
बीड जिल्ह्यातील पुजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी वानवडी परिसरातील हेवन पार्क येथील एका इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी, वानवडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्याच्या राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा संदर्भ थेट विद्यमान सरकारमधील तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्याशी जोडण्यात आल्यामुळे, राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे शेवटी राठोड यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यातच आता पुन्हा राठोड यांना मंत्रीपद मिळण्याच्या चर्चांना उधान आले आहे.
पुणे पोलिसांनी पुजाच्या आई-वडिलांचा पंधरा दिवसापूर्वी नव्याने जबाब नोंदविला असून, त्यात त्यांनी आमची कुणाविरुद्ध तक्रार नसल्याचे सांगितले आहे.
-दिपक लगड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वानवडी