सांगली जिल्ह्यात सव्वावर्षांनी शाळा सुरू, गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत | पुढारी

सांगली जिल्ह्यात सव्वावर्षांनी शाळा सुरू, गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यात कोरोनामुळे बंद पडलेल्या शाळा तब्बल सव्वावर्षानंतर गुरुवारी सुरू झाल्या. सांगली जिल्ह्यातील कोरोनामुक्त 20 गावांतील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना आनंद झाला. विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

शासनाने कोरोनाबाधित क्षेत्र नसलेल्या गावांतील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्याबाबतचे आदेश दिले आहेत. मागील एका महिन्यात कोरोना रुग्ण ज्या गावात सापडलेले नाहीत, त्या गावात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तब्बल सव्वा वर्षानंतर 20 शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. कोरोनामुक्त गावात शाळा सुरू झाल्याने ऑनलाईन क्लास करून कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. कडेगाव व खानापूर तालुक्यातील प्रत्येकी 6, जत 5 आणि तासगाव तालुक्यातील 3 शाळा सुरू झाल्या आहेत.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एका बेंचवर एका विद्यार्थ्याला बसविण्यात आले. शाळेत आल्यावर सॅनिटायझरसह ऑक्सिजन पातळी, ताप याची तपासणी करण्यात आली.

अनेक दिवसांनंतर शाळा सुरू झाल्याने शिक्षक, मित्र, मैत्रिणी यांना भेटण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता.

कोरोना नियमांचे पालन करत सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

जिल्ह्यातील 170 गावे कोरोनामुक्तआहेत. या ठिकाणी आठवी ते बारावीपर्यंत वर्ग असल्यास शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र तत्पूर्वी संबंधित गावांचे सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समितीची मान्यता घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

शहरी भागातील शाळा अजून कुलूपबंद आहेत. त्यामुळे शहरी भागातील मुलांचा हिरमोड झाला आहे.

गावांचा ठराव, पालकांची संमती

कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू करण्याबाबत दिलेला ठराव पालकांची संमती व कोरोनाची स्थानिक स्थिती पाहून निर्णय घेतला जात आहे.

आगामी दोन दिवसांत किती शाळा सुरू होतील व किती विद्यार्थी शाळेत हजर राहतील, याचे चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी दिली.

Back to top button