पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या प्रभागरचनेचा कच्चा आराखडा करताना अखेरच्या क्षणी एका वरिष्ठ नेत्याने राष्ट्रवादीला धोबीपछाड करून शह दिल्याची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे. या प्रभागरचनेला राष्ट्रवादीने आपल्याला अनुकूल आकार दिल्याच्या भरवशावर त्या पक्षातील नगरसेवक आणि इच्छुक निर्धास्त असतानाच हा अनपेक्षित धक्का बसल्याने पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचनेचा कच्चा आराखडा पालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला सोमवारी सादर केला. प्रामुख्याने राज्यात ज्या पक्षाची सत्ता असते, तो पक्ष प्रशासनावर दबाव आणून स्वत:साठी ही प्रभागरचना अनुकूल करण्याचा प्रयत्न करीत असतो. 2017 ला शहराची संपूर्ण प्रभागरचना विरोधी पक्षांना अडचणीत आणणारी आणि भाजपला सोयीची अशीच असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळे आता राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने पुण्यातील प्रभागरचना राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल अशीच होणार, असे मानले जात होते.
प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार झाल्यावरही राष्ट्रवादीसह काही प्रमाणात शिवसेना आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकांच्या सोयीनुसार ही रचना झाल्याची चर्चा होती. मात्र, ही चर्चा सुरू असतानाच काही नेत्यांनी अखेरच्या क्षणी प्रभागरचना आपल्याला अनुकूल ठरेल अशा सूचना दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. प्रशासनाकडून सोमवारी हा आराखडा निवडणूक आयोगाला सादर केला जाणार होता. रविवारी सुटीचा दिवस होता. या संधीचा फायदा उठवत काही प्रमुख पदाधिकार्यांनी राज्यात एका बड्या नेत्याचा दबाव आणून या प्रभागरचनेत हस्तक्षेप केला आणि त्यात सोयीनुसार बदल केल्याचे आता सांगण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसह सेना आणि काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
आता प्रभागरचना अनुकूल करण्यासंदर्भात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असले, तरी नक्की ही प्रभागरचना कोणासाठी अनुकूल झाली, हे प्रभागरचना जाहीर झाल्यावरच स्पष्ट होऊ शकणार आहे.
हेही वाचा