नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : Anti BJP front : विरोधकांनी एकाच आघाडीखाली एकत्र यावे. त्याचे नेतृत्व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी करावे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच काँग्रेसला वगळून आघाडी अशक्य आहे, याचा पुनरूच्चार शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केला. राऊत यांनी बुधवारी संध्याकाळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आपले मते व्यक्त केले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) बाबत मुंबई दौर्यादरम्यान केलेल्या वक्तव्यावर राऊत यांनी काँग्रेसशिवाय आघाडी शक्य नाही आणि या आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी यांनी केले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
विरोधक एकसंध नाहीत. यावर काही चर्चा झाली का, असे विचारले असता राऊत म्हणाले, या मुद्द्यावर चर्चा झाली. विरोधकांची आघाडी होणार असेल तर ती काँग्रेसशिवाय शक्य नाही.
शिवसेनेने हा मुद्दा आधीच स्पष्ट केला आहे. महाराष्ट्रातील तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार हे मिनी यूपीएसारखेच आहे. शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद आहे आणि काँग्रेस व राष्ट्रवादी हे मित्रपक्ष सत्तेत सहभागी आहेत, असे त्यांनी सांगितले.
आपण आघाडीचे नेतृत्व केले पाहिजे, असा आग्रह मी राहुल गांधी यांच्याकडे धरल्याचे सांगून राऊत म्हणाले, आपण यासंदर्भात मोकळेपणाने बोलले पाहिजे, काम केले पाहिजे. अनेक पक्ष सध्या काँग्रेससोबतच्या आघाडीत आहेत. मग, वेगळी आघाडी कशासाठी, असे राऊत म्हणाले.