Reserve Bank of India : सलग आठव्यांदा व्याज दर जैसे थे! | पुढारी

Reserve Bank of India : सलग आठव्यांदा व्याज दर जैसे थे!

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) आज पतधोरण जाहीर केले. सलग आठव्यांदा आरबीआयने रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात बदल केलेला नाही. आरबीआयने रेपो रेट ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्के एवढा कायम ठेवला आहे. तसेच अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे संकेत आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी दिले आहेत. अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. या काळात मागणी वाढल्याने अर्थव्यवस्था रुळावर येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

आरबीआयने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वृद्धीचा दर ९.५ टक्के एवढा कायम ठेवला आहे. तर या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वृद्धी दर लक्ष्य ७.९ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ६.८ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ६.१ टक्के एवढे ठेवले आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १७.२ टक्के जीडीपी राहील, असा अंदाज शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला आहे.

आरबीआयने (Reserve Bank of India) पतधोरण जाहीर करताना सलग आठव्यांदा व्याज दरात बदल केलेला नाही. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेत मोठी घसरण झाली होती. आता कोरोनातून सावरत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा होत आहे. मात्र, महागाईवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, चालू आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी दर ८.३ टक्क्यांवर जाण्याचा अंदाज जागतिक बँकेने ताज्या अहवालात वर्तविला आहे. खासगी गुंतवणुकीत होत असलेली वाढ तसेच निर्मिती क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारकडून योजले जात असलेले उपाय यामुळे आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, अशी टिप्पणीही जागतिक बँकेने केली आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : नीरज चोप्राच्या भाल्यासारखा अचूक वेध घेणारे वृत्तपत्र विक्रेते

Back to top button