नांदेड : समीर येवतीकर मृत्यू प्रकरणी ३ सावकारांविरुद्ध गुन्हा | पुढारी

नांदेड : समीर येवतीकर मृत्यू प्रकरणी ३ सावकारांविरुद्ध गुन्हा

नांदेड; पुढारी वृत्तसेवा : अवैध सावकारीचा बळी ठरलेला तरुण उद्योजक समीर येवतीकर याच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी अवैध सावकार दीपक पाटील याच्यासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. मुख्य आरोपी दीपक पाटील फरार असून अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान मृत समीर येवतीकर यांच्यावर बुधवारी रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंबिकानगर येथील तरुण उद्योजक समीर सुधाकरराव येवतीकर (वय ४२) यांचा कुलश्री आवळा कँण्डी या नावाने आवळ्यापासून विविध प्रकारचे पेयजल तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय होता. नांदेडसह लगतच्या जिल्ह्यात त्यांच्या या पदार्थांना मोठी मागणी होती. येवतीकर हे घरातच वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी आणून विविध प्रकारचे पेयजल तयार करत होते.

त्यांचा व्यवसाय भरभराटीस येत असताना आर्थिक अडचण भासत असल्याने त्यांनी अवैध सावकार दीपक पाटील यांच्याकडून एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. या रकमेसाठी येवतीकर यांनी तब्बल व्याजापोटी साडेसहा लाख रुपये परत केले. तरीही दीपक पाटील हा सावकार येवतीकर यांच्याकडे व्याजासाठी तगादा लावत होता. चक्रवाढ व्याज व अन्य कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळत होता. अनेकवेळा समजावून सांगून देखील दीपक पाटील ऐकत नसल्याने येवतीकर यांनी जीवल संपवले होते.

Back to top button