रुफ टॉप हॉटेल, पबवर वारंवार कारवाई; पुन्हा थाटली जातात अनधिकृत बांधकामे  | पुढारी

रुफ टॉप हॉटेल, पबवर वारंवार कारवाई; पुन्हा थाटली जातात अनधिकृत बांधकामे 

पुणे :  पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडून शहरातील रूफ टॉप हॉटेल आणि पबवर वारंवार कारवाई करूनही पुन्हा ती सुरू केली जातात. यामुळे संबंधित हॉटेल व पबवर फौजदारी कारवाई करावी, तसेच संबंधितांचे परवाने रद्द करावेत, असे पत्र महापालिकेने पोलिस प्रशासनाला जानेवारीतच दिले आहे. मात्र, यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने सर्व रूफ टॉप हॉटेल आणि पब जोमात सुरू दिसत आहेत. कल्याणीनगर येथील बॉलआर पबसमोर रविवारी मध्यरात्री बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाच्या कारने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणाचा व एका तरुणीचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील पब आणि रुफ टॉप हॉटेलचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहराच्या विविध भागात इमारतीच्या टेरेसवर, तसेच सामाईक जागेत शेड उभे करून हॉटेल व्यवसाय केला जात आहे.
यामुळे रस्त्यांवर पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो, तसेच रात्री उशिरापर्यंत ही हॉटेल सुरू राहतात, त्यामुळे या भागातील नागरिकांना त्याचा उपद्रव होतो. पार्किंग, ध्वनिप्रदूषण यासंदर्भात नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येतात. याची दखल घेत महापालिकेने रुफ टॉफ हॉटेलवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती.  शहरातील 89 अनधिकृत रुफ टॉप हॉटेलपैकी 76 हॉटेल्सला नोटीस पाठविण्यात आली. त्यापैकी 53 हॉटेलवर कारवाई केली गेली. सहा हॉटेल मालकांनी स्वत:हून अनधिकृत बांधकाम काढून घेतले आहे. सात हॉटेल्सचा वापर बंद झाला आहे. सात हॉटेल्स मालकांनी कारवाईला स्थगिती मिळविली आहे. तसेच नऊ हॉटेल्सवर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या कलाम 52 नुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहे.  या हॉटेल्सवर गुन्हा नोंदवूनही त्याचा पुन्हा वापर केला जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी करणारे पत्र महापालिकेने पुणे पोलिसांना लिहिले होते, त्यावर अद्याप कारवाई झाली नाही.
दरम्यान, कल्याणीनगर भागातील नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करणार्‍या पबचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली.

अनधिकृत बांधकामांचा अहवाल स्थायी समोर

शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येते. या कारवाईदरम्यान प्रथम नोटीस बजावून पुढील प्रक्रिया पार पाडली जाते. अनधिकृत बांधकामांवर कारवाई संदर्भात बांधकाम विभागाच्या वतीने प्रत्येक महिन्याला काय कारवाई केली, याचा अहवाल स्थायी समितीसमोर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कारवाईमध्ये कुचराई करणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत दिला आहे.

हेही वाचा

Back to top button