एसटी बस संख्या अपुरी; खासगी बसचालकांकडून प्रवाशांची लूट! तिकीट दरात तिप्पट वाढ | पुढारी

एसटी बस संख्या अपुरी; खासगी बसचालकांकडून प्रवाशांची लूट! तिकीट दरात तिप्पट वाढ

हडपसर : पुढारी वृत्तसेवा : शाळा आणि महाविद्यालयांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्याने नागरिक मुलांसह गावी जात आहेत. मात्र, एसटी महामंडळाच्या बसची संख्या अपुरी असल्याने नागरिकांना खासगी बसच्या तिकिटासाठी तिप्पट पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे सोलापूर रोडवर खासगी बसचालकांकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. प्रवाशांकडून सोलापूर मार्गावरून जाण्यासाठी गाडीतळ येथून जादा बस सोडण्याची एसटी महामंडळाकडे मागणी होत आहे.

उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे गावाकडे जाणार्‍या प्रवाशांची संख्या सध्या वाढली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपूसन हडपसर येथे सोलापूर रोडवर प्रवाशांची गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गाडीतळ रवीदर्शन येथे एसटी महामंडळाचा बस थांबा आहे. सोलापूर, तुळजापूर, लातूर, उदगीर, उमरगा, धाराशिव, अक्कलकोट, अकलूज, जामखेड, बार्शी, करमाळा, श्रीगोंदा, हैदराबाद, तेलंगणा, या मार्गांवरील एसटी बस हडपसर येथून जातात. त्यामुळे दररोज रात्री आठनंतर प्रवाशांची गाडीतळ रवीदर्शन ते पुढे सोलापूर रोड लक्ष्मी कॉलनीपर्यंत गर्दी होत आहे.

एसटी बसची संख्या अपुरी असल्यामुळे प्रवासी खासगी बससह इतर वाहनांचा आधार घेत आहेत. याचा फायदा घेऊन खासगी बसमालकांनी तिकीट दर तिपटीने वाढवले असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले. एसटी बसची तासन् तास वाट पाहूनदेखील शहरातून त्या भरून येत असल्याने प्रवाशांना नाइलाजस्तव तिप्पट पैसे देऊन खासगी बसने प्रवास करावा लागत आहे. इतर खासगी वाहनचालकदेखील प्रवाशांकडून जास्त पैसे घेत आहेत. तसेच, क्षमतेपक्षा जास्त प्रवासी भरून ते धोकादायक पद्धतीने प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. याकडे हडपसर वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

उन्हाचा कडाका वाढल्यामुळे रात्रीचा प्रवास

हडपसर गाडीतळ येथील वाहक सुनील अर्जुन यांनी सांगितले, उन्हाचा कडाका वाढल्यामुळे बहुतेक प्रवासी रात्रीचा प्रवास करत आहेत. त्यामुळे एसटी बसला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. गाडीतळ येथून लातूर व उमरगा या मार्गावर दोन बस सोडणे आवश्यक आहे. प्रवासी संख्या जास्त असल्याने या बस गाडीतळ येथूच भरल्या जाऊ शकतात.

खासगी बसने उमरगा येथे जाण्यासाठी सुमारे अडीशे ते तीनशे रुपये तिकीट आहे. मात्र, प्रवाशांची गर्दी वाढल्याने खासगी बसचालक आता एक हजार रुपयांपर्यंत तिकिटाचा खर्च घेत आहेत. एसटी बस कमी असल्याने खासगी बसचालकांकडून प्रवाशांची लूट केली जात आहे.

-साहेबराव जाधव, प्रवासी

मी लातूरला नेहमी ये-जा करतो. मात्र, उन्हाळ्याच्या सुटीमुळे प्रवाशांची संख्या वाढल्याने खासगी बसमालकांनी तिकीट दर तीन पटीने वाढवले आहेत. प्रवाशांची गर्दी जास्त असल्याने एसटीचे आरक्षित तिकीट बुक होत नाही. याचाच फायदा खासगी बसमालक घेत आहेत.

-तुषार शिंदे, प्रवासी

सोलापूर मार्गावर रात्रीच्या वेळी प्रवाशांची संख्या सध्या वाढली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी हडपसर, गाडीतळ येथे एक वाहकाची नेमणूक करण्यात आली आहे. वाढलेल्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन सोलापूर मार्गावर जादा बस सोडण्यात येत आहेत.

-भूषण सूर्यवंशी, व्यवस्थापक, स्वारगेट एसटी डेपो

हेही वाचा

Back to top button