Loksabha election | बारामतीत मतदान घटल्याचा फटका कोणाला? काय सांगते आकडेवारी? | पुढारी

Loksabha election | बारामतीत मतदान घटल्याचा फटका कोणाला? काय सांगते आकडेवारी?

दिगंबर दराडे

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात घटलेल्या टक्केवारीचा फटका शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे की अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना बसणार? याविषयी आता चर्चा रंगू लागल्या आहेत. बारामती लोकसभेसाठी 2019 मध्ये 61.70 टक्के मतदान झाले होते. 2024 च्या निवडणुकीत 2.2 टक्के मतदानाची घट होऊन 58.50 टक्के मतदान झाले आहे.

जिल्हा प्रशासनाने मतदान वाढीसाठी विविध प्रयत्न केले. मात्र, उष्णतेचा पारा आणि मतदारांचा निरुत्साह यामुळे मतांचा टक्का घटल्याचे वास्तव समोर आहे. या घटलेल्या मतदानाचा फटका सुळेंना बसणार की सुनेत्रा पवारांना बसणार हे 4 जूनलाच स्पष्ट होणार आहे. हे जरी खरे असले तरी सुळे आणि पवार यांच्या समर्थकांनी लाखांवर मताधिक्याने आमचा उमेदवार विजयी होईल, असा दावा केला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.7) मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदार याद्यांतील घोळ, ईव्हीएममधील बिघाड, तुरळक वादावादी वगळता ही प्रक्रिया सुरळीत पार पडली. निवडणूक आयोगाने केलेल्या प्रभावी जनजागृतीकडे पाठ फिरवून नागरिकांनी मतदान करण्यास निरुत्साह दाखवला. बारामती लोकसभा मतदारसंघात 38 उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात
उतरले आहेत.

बारामती लोकसभा मतदार संघामध्ये 59.50 टक्के मतदान झाले असून, गेल्या निवडणुकीपेक्षा दोन टक्के कमी मतदान झाले आहे. बारामती मतदारसंघात 23 लाख 72 हजार 668 मतदारांपैकी 14 लाख 11 हजार 621 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. तर 9 लाख 61 हजार 47 मतदारांनी मतदान केले नाही. मतदान केलेल्यांमध्ये 7 लाख 74 हजार 383 पुरुष, 6 लाख 37 हजार 219 महिला व 19 तृतीयपंथींचा समावेश आहे. पुरुषांचे प्रमाण एकूण मतदारांच्या तुलनेत 62.35 टक्के, महिलांचे प्रमाण 56.36 टक्के, तर तृतीयपंथींचे प्रमाण 16.38 टक्के इतके आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात तुलनेने कमी म्हणजे 51.55 टक्के मतदान झाले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय आणि कोणत्या भागात कोणाचा जोर होता, यावरच हाय व्होल्टेज निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे. कमी- जास्त झालेल्या मतदानाचे परिणाम काय होतील, याचीच चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात 51.55 टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान 69.48 टक्के मतदान बारामती विधानसभा मतदारसंघात झाले आहे. गेल्या वर्षी बारामती लोकसभा मतदारसंघात 61.70 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यंदा मतदानात 2 टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.

तुतारी की घड्याळ… लागल्या पैजा

पुणे शहर आणि परिसरात आता देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून पैजा लागलेल्या आहेत. कोणी म्हणतयं तुतारी वाजणार तर कोण म्हणतयं घड्याळच येणार… विकास की सहानभुती हे निवडणुकीचे मुद्दे होते. त्यामुळे बारामतीच्या निकालावर पैजा लागल्या आहेत. लाखो रुपयांच्या पैजा लागल्या आहेत. सकाळी वॉकिंग करणार्‍या ग्रुपपासून ते कट्ट्यावर बसणार्‍या कार्यकर्त्यांपर्यंत एकच चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

मतदानवाढीसाठीच्या उपाययोजना ‘फे ल’

जिल्हा प्रशासनाने मतदानवाढीसाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. मात्र, मतदार राजाने मतांचा टक्का वाढविण्याऐवजी घटविल्याचे वास्तव समोर आले आहे. खडकवासला, दौंडमध्ये मतांचा टक्का घटला आहे. तर इंदापूर, बारामतीमध्ये समाधानकारक मतदान झाले आहे. घटलेला टक्का कोणाला त्रासदायक ठरणार, हे पाहावे लागणार आहे.

हेही वाचा

Back to top button