सीबीएसई विद्यार्थ्यांनी ‘इतक्या’ दिवसापर्यंत करता येणार गुणपडताळणीसाठी अर्ज | पुढारी

सीबीएसई विद्यार्थ्यांनी 'इतक्या' दिवसापर्यंत करता येणार गुणपडताळणीसाठी अर्ज

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई दहावी आणि बारावीचा निकाल येत्या 20 मेनंतर जाहीर केला जाईल, असे सीबीएसई बोर्डाने जाहीर केले. त्यानंतर आता सीबीएसईकडून आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार निकाल जाहीर झाल्यानंतर चौथ्या दिवसापासून आठव्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना एकूण पाच दिवस गुणपडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर जे विद्यार्थी निकालाविषयी असमाधानी असतील आणि ज्यांना गुणपडताळणी करायची असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी सीबीएसईकडून गुणपडताळणीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसईच्या अधिसूचनेनुसार ग्रेडची पडताळणी करण्यासाठी अर्ज करण्याची संधी पाच दिवसांसाठी उपलब्ध असेल. श्रेणीबद्ध उत्तरपत्रिकेची स्कॅन केलेली छायाप्रत निकाल जाहीर झाल्यानंतर 19 व्या दिवसापासून 20 व्या दिवसापर्यंत उपलब्ध असेल. निकाल जाहीर झाल्याच्या तारखेनंतर 24 ते 25 व्या दिवसांदरम्यान उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी उपलब्ध असतील, असेही सीबीएसईने स्पष्ट केले आहे.

सीबीएसईमार्फत घेतलेल्या दहावी-बारावीच्या 2024 च्या परीक्षेमध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांना गुणांची पडताळणी, मूल्यमापन केलेल्या उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती प्राप्त करणे आणि उत्तरांचे पुनर्मूल्यांकन करण्याची विनंती करण्याची विशिष्ट प्रक्रिया निकालानंतर कळवली जाईल, असेही सीबीएसईने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

Back to top button