Loksabha election | हिंजवडी परिसरात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद; दुपारी १ वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान | पुढारी

Loksabha election | हिंजवडी परिसरात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद; दुपारी १ वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान

सागर शितोळे

हिंजवडी : आयटी नगरी हिंजवडी आणि परिसरात मतदारांनी आज मंगळवारी (दि.७ मे) रोजी होत असलेल्या लोकसभा मतदानास संमिश्र प्रतिसाद दाखवला. अनेक आयटीयन्सनी पहाटे मतदान करण्यास प्राधान्य दिले. तर स्थानिक ग्रामस्थ मात्र दुपार नंतर मतदानासाठी घराबाहेर पडले. तसेच येथील काही बूथवर दुपारी १ वाजेपर्यंत ३५ टक्के किंवा त्यापेक्षाही अधिक मतदान झाले होते.

तर अनेक ठिकाणी मतदानाने १२-१५ टक्के इतकीच पातळी गाठली होती. त्यामुळे बूथवरील कार्यकर्त्यांनी मतदारांना घराबाहेर पडून मतदान करावे यासाठी फोन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मतदारांची रोडवलेली संख्या देखील वाढली होती. मे महिन्यातील कडक उन्हामुळे अनेकांनी सकाळी मतदान करत असताना, उन्हात देखील अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा होत्या. मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रावर मेडिकल किट, अपंग मतदारणासाठी ‘व्हील चेअर’ पाण्याची सुविधा आणि चार मतदान केंद्र असतील तेथे मंडपाची व्यवस्था यावेळी करण्यात आली होती.

अनेक मतदारांचे नाव गायब..

आयटी परिसरात असलेल्या अनेक मतदारांचे नाव मतदार यादीत नसल्याचे प्रकार मारुंजी आणि माण, हिंजवडी येथे घडत होते. अनेकांची नावे शोधण्यात यामुळे अडचण निर्माण होत होती. परिणामी निराश होऊन काही मतदार निघून गेले.

मारुंजी येथे हमरीतुमरीमुळे काही काळ तणाव..

सकाळच्या सत्रात मतदारांची संख्या कमी होती. मात्र बूथ वरील अनेक कार्यकर्ते बाहेर फिरत होते. त्यामुळे मारुंजी येथील काही पदाधिकाऱ्यांनी यास आक्षेप घेतला. त्यामुळे मारुंजी येथील सहा बुथवर काही काळ तणावाचे वातावरण होते. त्या नंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळी करण्यात आला होता. त्यानंतर मतदान सुरळीत पार पडत होते…

हेही वाचा

Back to top button