बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी : स्थानिकांचा आक्रोश | पुढारी

बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी : स्थानिकांचा आक्रोश

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील लेंडेस्थळ येथे रविवरी (दि.5) सायंकाळी पाचच्या सुमारास कोबीच्या शेतामध्ये खुरपणी करणार्‍या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. त्यात ही महिला गंभीर जखमी झाली आहे. अश्विनी मनोज हुळवळे (वय 24), असे या महिलेचे नाव आहे. या महिलेला नारायणगाव येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. तिच्या डोक्याला व मानेला गंभीर जखमा झाल्या आहेत. तसेच श्वसननलिकेला छिद्र पडले असून, त्या ठिकाणी डॉक्टरांनी नळी बसवली आहे. या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, लेंडेस्थळ येथील शेतकरी भाऊ सदाशिव लेंडे यांच्या कोबी पिकाची खुरपणी अशोक हुळवळे, मंगल हुळवळे व अश्विनी हुळवळे करीत होते. घरी लहान बाळ असल्यामुळे आजी मंगल हुळवळे घरी गेल्या. त्यानंतर बिबट्याने अश्विनी यांच्यावर पाठीमागून येऊन हल्ला केला. मानेला पकडून त्यांना बाजूच्या शेतात फरफटत नेले. भाऊसाहेब लेंडे यांच्यासह स्थानिक शेतकर्‍यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने महिलेला सोडून पळ काढला. दरम्यान, जखमी अश्विनी यांना सारिका लेंडे, बाळू लेंडे व अशोक हुळावळे यांनी तातडीने नारायणगाव येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले.

वन अधिकार्‍यावर प्रश्नांची सरबत्ती

घटनेची माहिती कळतात वनक्षेत्र अधिकारी वैभव काकडे हे नारायणगाव येथील रुग्णालयात तत्काळ दाखल झाले. जखमी महिलेच्या नातेवाइकांनी वनक्षेत्र अधिकारी काकडे यांना गराडा घालून बिबट्या किती लोकांचे बळी घेणार आहे ? किती लोकांना हल्ला करणार आहे ? तुम्ही काय झोपा काढता का ? नोकरीचा राजीनामा द्या आणि घरी जा. पकडलेले बिबट्या नक्की सोडता कुठे ? तुम्हाला बिबट्यांचा फार कळवळा आहे तर तुम्ही सांभाळा. आम्ही किती दिवस बिबट्याचा उपद्रव सहन करायचा ? असे प्रश्न उपस्थित केले. तसेच यापुढे पुन्हा बिबट्याने आमच्या परिसरामध्ये कोणावर हल्ला केल्यास सामूहिक पद्धतीने बिबट्याला ठार मारू, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

हेही वाचा

Back to top button