पीएमपी अ‍ॅपची चाचणी अयशस्वी; आठवड्यात त्रुटी दुरुस्ती होणार | पुढारी

पीएमपी अ‍ॅपची चाचणी अयशस्वी; आठवड्यात त्रुटी दुरुस्ती होणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपी प्रशासनाने शनिवारी (दि. 4) घेतलेली अ‍ॅपची चाचणी अयशस्वी ठरली. यात पीएमपी अधिकार्‍यांना अनेक त्रुटी आढळल्या. या त्रुटी दुरुस्तीसाठी अ‍ॅप पुन्हा संबंधित कंपनीला दिले आहे. त्रुटी दुरुस्त झाल्यावर ते अ‍ॅप आठवडाभरात पुणेकरांच्या हाती येण्याची शक्यता आहे.
ओला, उबेर टॅक्सीप्रमाणेच पीएमपी प्रवाशांना लाइव्ह लोकेशन, ऑनलाइन पेमेंटसह अन्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी अ‍ॅप सुरू केले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून ही प्रक्रिया प्रशासनाकडून केली जात आहे. परंतु, प्रशासनाला यात काही यश आल्याचे दिसत नाही. मात्र, आता यात प्रशासनाला यश येण्याची चिन्हे दिसत असून, अ‍ॅपचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे पुणेकरांना आणि पीएमपीला मोठा फायदा होणार आहे.

असा सुरू झाला अ‍ॅपचा प्रवास

तत्कालीन अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या काळात तत्कालीन सहव्यवस्थापकीय संचालिका डॉ. चेतना केरुरे यांनी हे अ‍ॅप तयार करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर तत्कालीन अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया, डॉ. सचिंद्र प्रताप सिंह यांनीदेखील अ‍ॅप सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, पीएमपीमध्ये कालावधी पूर्ण होण्याआधीच होणार्‍या बदल्यांमुळे पीएमपीचे अ‍ॅप काही सुरू झाले नाही. मात्र, डॉ. सचिंद्र प्रताप सिंह यांच्या काळात गुगल पे सुविधा सुरू झाली आहे. मात्र, अधिकार्‍यांच्या आणि वाहकांच्या भ्रष्ट मानसिकतेमुळे ही सेवा किती दिवस चालणार हे पाहावे लागणार आहे. त्यासोबतच आत्ताचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते आणि सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी पीएमपीचे अ‍ॅप सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परंतु, त्यांना यामध्ये यश येणार की नाही, तसेच, त्यांचीसुद्धा अ‍ॅप सुरू होण्याअगोदर बदली होणार का, हे आता पाहावे लागणार आहे.

पीएमपीचा कारभार ऑनलाइन करण्याची गरज

पीएमपीतील संपूर्ण कारभार ऑनलाइन करणे, ही सध्या मोठी गरज बनली आहे. सुट्ट्या पैशापासून नवी गाडी खरेदी करण्यापर्यंत आणि ताफ्यातील जुनी गाडी स्क्रॅप करण्यापर्यंत येथे भ्रष्टाचार फोफावला आहे. येथील कारभार ऑनलाइन झाला, तर प्रवाशांच्या सुट्ट्या पैशांच्या चिंतेसोबत, प्रवाशांना तासन् तास बस थांब्यावर थांबावे लागणार नाही. तसेच, येथील भ्रष्टाचारालादेखील आळा बसणार आहे. मात्र, याला वर्षानुवर्षे येथे ठाण मांडून बसलेल्या काही अधिकार्‍यांचा आणि वाहकांचासुद्धा विरोध असल्याचे सातत्याने समोर येत आहे. हे सर्व मोडून काढण्यासाठी पीएमपीचा कारभार ऑनलाइन असणे आवश्यक आहे.

अ‍ॅपमध्ये आढळल्या या त्रुटी

आम्ही शनिवारी अ‍ॅपची चाचणी घेतली. या वेळी अनेक त्रुटी आमच्यासमोर आल्या आहेत. यात अ‍ॅपमधील 50 टक्के ट्रान्झॅक्शन फेल झाले. लवकर तिकीट व्हॅलिड होत नाही. मार्गावरील तिकिटांचे पैसे कमी दिसत आहेत. त्यामुळे हे अ‍ॅप पुन्हा ‘ईबीक्स’ कंपनीला त्रुटी दुरुस्तीसाठी देण्यात आले आहे. आठवडाभरात दुरुस्ती होऊन हे अ‍ॅप आमच्याकडे येईल. तेव्हा पुन्हा या अ‍ॅपची चाचणी घेतली जाईल. त्यानंतर ते प्रवाशांपर्यंत पोहोचेल, असे पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी सांगितले.

पीएमपीच्या अ‍ॅपचे फायदे

  • अ‍ॅपमुळे प्रवाशांना ऑनलाइन पेमेंट करता येणार
  • चित्रपटगृहाप्रमाणे ऑनलाइन तिकीट मिळणार
  • पीएमपीकडील सर्व प्रकारचे डेली पास
  • अ‍ॅपद्वारे मिळणार
  • बस मार्ग आणि मार्ग क्रमांक यांची माहिती मिळणार
  • ओला, उबेरप्रमाणे बसचे लाइव्ह लोकेशन समजणार
  • सुट्ट्या पैशांसाठी वाहकासोबत वाद घालावे लागणार नाहीत
पुणेकर प्रवाशांसाठी उपयुक्त असलेल्या ‘पीएमपीएमएल’च्या अ‍ॅपची शनिवारी चाचणी झाली. या वेळी  ट्रान्झॅक्शन कसे होतेय, यासह अ‍ॅपमधील अन्य काही त्रुटींची तपासणी झाली. लवकरच ते प्रवाशांच्या हाती असेल.
– डॉ. संजय कोलते, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल
हेही वाचा

Back to top button