केंद्रीय नेतृत्वाच्या सल्ल्यानेच सेना, राष्ट्रवादीशी हातमिळवणी : विनोद तावडे | पुढारी

केंद्रीय नेतृत्वाच्या सल्ल्यानेच सेना, राष्ट्रवादीशी हातमिळवणी : विनोद तावडे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षामध्ये कोणाताही निर्णय केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करूनच घेतला जातो. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांशी हातमिळवणी करताना केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा झाली होती, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुडाचे राजकारण केले नसल्याचा निर्वाळाही तावडे यांनी दिला. पुणे श्रमिक पत्रकार संघात शुक्रवारी आयोजित केलेल्या वार्तालापात तावडे बोलत होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी उपस्थित होते. तावडे म्हणाले, एनडीए सरकारची दहा वर्षांची कामगिरी आणि 2047 पर्यंतच्या विकसित भारताचे व्हिजन मतदारांपुढे मांडण्याचे काम भाजपकडून केले जात आहे.

विरोधकांना उमेदवार मिळत नसल्याचे चित्र आहे. यंदाच्या दोन टप्प्यांतील निवडणुकीची टक्केवारी गेल्या वेळेच्या पहिल्या दोन टप्प्यांतील टक्केवारीइतकीच राहिली आहे. याउलट विरोधी पक्षांकडून भाजप घटना बदलणार असल्याचा प्रचार केला जात असून, तो साफ चुकीचा आहे. पूर्ण बहुमत असताना भाजपने कधीही घटनेला हात लावला नाही. काँग्रेसने यापूर्वी 80 वेळा घटनेत बदल केला. आम्ही फक्त 370 कलम रद्द केले. आमची युती विचारधारेवर होती, परंतु उद्धव ठाकरेंनी लोकांशी गद्दारी केल्याची टीका तावडे यांनी केली.

खालच्या पातळीवर जाऊन टीका

राज्यात शरद पवार साहेब आपल्या सुनेचा बाहेरची सून आणि संजय राऊत अमरावतीच्या उमेदवारावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. काँग्रेसने आपल्या जाहिरातीत पहिल्यांदाच सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचे छायाचित्र वापरले नाही. कदाचित फोटो टाकले तर मते कमी होतील, अशी भीती असल्याने त्यांनी फक्त मुद्द्यांवर भर दिला आहे.

खडसे यांना विरोध नाही

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांच्या प्रवेशावर तावडे म्हणाले, भ—ष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांवर चार्जशीट दाखल आहे. न्यायालयाच्या निर्णयावर पुढचे ठरवू. खडसेंच्या पक्षप्रवेशावर ते म्हणाले, एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश लवकरच होईल. प्रवेशाला देवेंद्र फडणवीस यांचा विरोध नाही.

हेही वाचा

Back to top button