’जलसंपदा’च्या विरोधात शेतकरी आक्रमक : नारायणगाव कार्यालयासमोर ठिय्या | पुढारी

’जलसंपदा’च्या विरोधात शेतकरी आक्रमक : नारायणगाव कार्यालयासमोर ठिय्या

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : येडगाव धरणासाठी परिसरातील शेतकर्‍यांचा मोठा त्याग आहे. बहुतांश शेतकर्‍यांच्या या धरणामध्ये जमिनी गेल्या आहेत. मात्र, या बाधित शेतकर्‍यांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन झालेले नाही. त्यातही वेळेवर धरणातून शेतीसाठी पाणी मिळत नाही आणि वीजपंपाचे जोड तोडले जात आहेत, त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी जलसंपदा विभागाच्या नारायणगाव कार्यालयाच्या कार्यकारी अभियंत्यांना खुर्चीवर बसू देणार नाही, असा इशारा दिला आहे, अशी माहिती धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष बाबाजी नेहरकर यांनी दिली आहे.

येडगाव धरणातून कुकडी नदीतून पूर्ण दाबाने पाणी शिरूर नगरपरिषदेच्या हद्दीत पिण्यासाठी नेणे शक्य व्हावे म्हणून धरणालगतच्या सर्व शेतकर्‍यांच्या कृषी पंपांचे वीजजोड दोन दिवसांपूर्वी नारायणगाव येथील जलसंपदा विभागाने महावितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांकडून तोडले. परंतु स्थानिक शेतकरी आक्रमक झाल्याने आणि आमदार अतुल बेनके यांनी मध्यस्थी करत हे वीजजोड जोडून देण्यात आले. तथापि शिरूरला पाणी पूर्ण दाबाने न्यायचे झाल्यास पुन्हा कृषी पंपांचे वीजजोड तोडावे लागेल, अशी माहिती या वेळी उपविभागीय अभियंता आर. जे. हांडे यांनी शेतकर्‍यांना दिली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी जलसंपदा विभागाच्या नारायणगाव कार्यालय आवारात मंगळवारी (दि. 30) ठिय्या आंदोलन केले. या वेळी नेहरकर बोलत होते.

सरपंच सीमा भोर, उपसरपंच अंकुश भोर, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सह्याद्री भिसे, माजी उपसरपंच हर्षल गावडे, माजी सरपंच देविदास भोर, कांदळीचे माजी उपसरपंच, अनिल भोर, प्रमोद शिंदे, शिवाजी गावडे, सचिन भोर, मोहन हांडे, सुजाता जाधव, नीलम खरात, मधुकर शिंदे, राजू ढवळे, गिरीश बांगर आदी शेतकरी या वेळी उपस्थित होते. यापुढे येडगाव परिसरातील एकाही शेतकर्‍याचे कृषी पंपाचे वीजजोड तोडणार नाहीत, याची हमी संबंधित अधिकारी देत नाही; तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांनी घेतला. ‘जय जवान जय किसान’ तसेच ‘कोण म्हणतो न्याय देत नाही, न्याय घेतल्याशिवाय आम्ही राहात नाही,’ अशा घोषणा देण्यात आल्या.

शेतकर्‍यांचा आक्रोश पाहून कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर हे आंदोलनस्थळी आले. त्यांनी शेतकर्‍यांचे प्रश्न समजून घेतले. यापुढे कृषी पंपाचे वीजजोड तोडायचे झाल्यास आपल्याला पूर्वकल्पना देता येईल, एखादी आपत्कालीन वेळ आली तर तशी पूर्वकल्पना देण्यात येईल. आपण आंदोलन थांबवावे अशी विनंतीदेखील केली. त्यावर शेतकर्‍यांनी आंदोलन थांबविले.

‘वीजजोडाला हात लावू देणार नाही’

येडगाव धरणाच्या भूमिपूजनाच्या वेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पूजनाचे ताट उधळणारे येडगाव येथीलच शेतकरी होते. आमचा येडगाव धरणासाठी मोठा त्याग आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये भविष्यकाळात आम्ही आमच्या कृषी पंपाच्या वीजजोडाला हात लावू देणार नाही, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली.

हेही वाचा

Back to top button