भीषण पाणीटंचाई! शिरूरला आजपासून दिवसाआड पाणीपुरवठा | पुढारी

भीषण पाणीटंचाई! शिरूरला आजपासून दिवसाआड पाणीपुरवठा

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर शहरात भीषण पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे. बुधवार, दि. 1 मेपासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कोल्हापूर बंधार्‍यात दि. 10 मे पर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

यापूर्वी 2017 मध्ये अशीच भीषण पाणीटंचाईला शिरूरकरांना सामोरे जावे लागले होते. कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्‍यात पाणीसाठा किती आहे यावर पुढचे नियोजन नगरपालिकेने करणे गरजेचे होते. मात्र, निवडणुकीमुळे आवर्तन सोडण्यास उशीर झाल्याने शहराला पुन्हा एकदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. कुकडी पाटबंधारे विभागाकडे पाणी सोडण्याची मागणी नगरपालिकेने केली असून पाठपुरावा सुरू असल्याचे पाणी पुरवठा अभियंता आदित्य बनकर यांनी सांगितले. 50 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शिरूर शहराला कुकडीचे आवर्तन मिळाले नाही तर शहराचा पाणीपुरवठा ठप्प होऊ शकतो.

मुख्य कार्यकारी अभियंता मंगेश सागळे यांना पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. या वेळी त्यांनी दोन ते तीन दिवसांत पाणी सोडतो असे सांगितले होते, त्यानुसार पाणी सोडण्यात आले आहे. शहरातील कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्‍यात लवकरच पाणी येईल.

– आमदार अशोक पवार

दि. 1 मार्च ते 8 एप्रिल यादरम्यान 61 क्रमांकाच्या चारीतून करमाळ्याकडे पाणी सोडण्यात आले होते. मात्र नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे कोल्हापूर पध्दतीचा बंधारा भरून घेतला गेला नाही. 150 क्युसेसने पाणी येत असताना बंधारा अर्धा भरला व त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. कुकडी पाटबंधारे विभागाकडे शिरूरसाठी पाणी आरक्षित नसून कुकडी पाटबंधारे विभाग नेहमी दुजाभाव करत आहे.

– अनिल बांडे, अध्यक्ष, शिरूर शहर प्रवासी संघ

अण्णापूर बंधार्‍यापर्यंत पाणी आले आहे. बुधवारी (दि. 1) सायंकाळपर्यंत पाणी येईल. शहरातील बोअरवेल दुरुस्त केले असून त्यांचाही फायदा होणार आहे.

– अ‍ॅड. सुभाष पवार, अध्यक्ष, शिरूर शहर विकास आघाडी

सन 2019 साली निवडणुकीच्या काळात अशाच परिस्थितीमुळे शहराला 13 दिवस पाणीपुरवठा टँकरने चालू होता. मात्र या वेळेस आम्ही दक्षता घेऊ. आमदार अशोक पवार यांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. तसेच नगरपालिकेने पाण्यासाठीचे पैसे वेळेत भरले आहेत.

– मुज्जफर कुरेशी, माजी सभापती, पाणीपुरवठा समिती

हेही वाचा

Back to top button