International Dance Day : गृहिणी, नोकरदार महिलांनाही नृत्याची ओढ! | पुढारी

International Dance Day : गृहिणी, नोकरदार महिलांनाही नृत्याची ओढ!

पुणे : सुवर्णा चव्हाण :  अक्षयने बॉलीवूड नृत्य शिकण्यासाठी नृत्य वर्गात प्रवेश घेतला आणि बघता बघता त्याने नृत्यात प्रावीण्य मिळविले. सध्या अक्षयप्रमाणे कित्येक शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन तरुण नृत्य शिक्षणाकडे वळले आहेत. त्यामुळेच गेल्या तीन ते चार वर्षांत पुण्यामध्ये नृत्य शिक्षण देणार्‍या संस्था आणि नृत्य वर्गांची संख्या वाढली आहे.

अंदाजे सात हजारांंहून अधिक संस्था आणि नृत्य वर्ग पुण्यात असून त्यामध्ये शास्त्रीय नृत्य प्रकार शिकविणार्‍या संस्था आणि वर्गांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात नृत्य संस्कृती मोठ्या प्रमाणात रुजत आहे. त्यामुळेच यंदा वैविध्यपूर्ण नृत्य प्रकार शिकविणार्‍या उन्हाळी शिबिरांकडे शालेय विद्यार्थ्यांचा कल असून अशा नृत्य शिबिरांना हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे.

बॉलीवूड असो वा लोकनृत्य, असे नृत्य प्रकार ज्येष्ठ नागरिकांसह नोकरदार महिला आणि गृहिणी शिकत असतील हे ऐकून आश्चर्य वाटेल. हे खरंय. फिटनेससाठी हे सगळे नृत्य शिक्षणाकडे वळले असून नृत्य दिग्दर्शकांकडून विशेष वर्ग आयोजित केले जात आहेत.

कथ्थक, भरतनाट्यमसह विविध शास्त्रीय नृत्य प्रकार, लोकनृत्य, कंटेम्पररी, हिपपॉप, बेली डान्स, साल्सा, ब्रेक डान्स, बी-बोईंग, लिरिकल, जॅझ, टॅप डान्स, रॉक अँड रोल, डिस्को, लॉकिंग अँड पॉपिंग आदी नृृत्यप्रकार शिकण्याकडे कल असल्याचे दिसून येते.

काही तरुण-तरुणी सोशल मीडियावर आपल्या नृत्याद्वारे प्रसिद्धी मिळवित आहेत. काही नृत्य दिग्दर्शक तरुण-तरुणी सोशल मीडियाद्वारे लोकांना घरबसल्या नृत्य शिकवण्यासाठी यू ट्यूब चॅनेलवर नृत्यवर्ग घेत आहेत; तर काहीजण विविध गाण्यांवर पाश्चात्त्य नृत्य रील्स आणि व्हिडीओ बनवून पोस्ट करीत नृत्याच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवत आहेत.

Back to top button