जिल्हा विशेष लेखापरीक्षकांचे कार्यालय अखेर स्वारगेटलाच.. | पुढारी

जिल्हा विशेष लेखापरीक्षकांचे कार्यालय अखेर स्वारगेटलाच..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे विभागीय सहनिबंधक कार्यालयाच्या अधिपत्याखालील जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 व अधिनस्त 7 कार्यालये विमाननगर येथील जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय विविध संघटनांच्या विरोधामुळे शासनाने अखेर रद्द केला आहे. त्याऐवजी स्वारगेटजवळील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या नवीन जागेत स्थलांतरावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

विमाननगर येथे कार्यालय हलविण्यास कर्मचारी संघटनांनी विरोध केला आणि मंत्रालय स्तरावरही पाठपुरावा केला. त्यामध्ये प्रामुख्याने राज्य सरकारी गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, नागपूर येथील महाराष्ट्र स्टेट को-ऑप. डिपार्टमेंट ऑडिटर्स असोसिएशनचा समावेश आहे. संघटनांच्या विरोधाच्या भूमिकेस दै. ’पुढारी’ने सातत्याने आवाज उठविला. अखेर त्याची दखल शासनाने घेत स्वारगेटच्या जागेवर शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबतची माहिती अशी की, जिल्हा विशेष लेखापरीक्षकांचे कार्यालय सध्या मार्केट यार्डातील भू-विकास बँकेच्या इमारतीत भाड्याने कार्यरत आहे. ही जागा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस (पीडीसीसी) विक्री केल्याने व करार संपल्याने नव्या जागेचा शोध घेण्यात आला. आता विमाननगरऐवजी स्वारगेटच्या जागेवर शासनाने शिक्कामोर्तब अंतिम करीत 16 एप्रिल रोजी शासन आदेश जारी केला आहे. त्यानुसार पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या स्वारगेट येथील कमर्शिअल इमारत क्रमांक 1, चौथा मजला येथे 35.17 रुपये दराने एकूण 12 हजार 362 चौरस फूट जागेचे भाडे संबंधित घरमालकाला देण्यास शासनाने काही अटींवर प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे.

“जिल्हा विशेष लेखापरीक्षकांचे कार्यालय विमाननगरऐवजी सर्वांना सोयीचे होईल अशा स्वारगेट येथील जागेतच स्थलांतर करण्याची चांगली मागणी महासंघाच्या पुणे कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी लावून धरली. त्यावर शासन स्तरावर योग्य पाठपुरावा करून ती मागणी मान्य झाल्याने शासनाचेही आम्ही आभारी आहोत. तसेच, दै. ’पुढारी’ने या विषयाला वाचा फोडली, त्याबद्दल कामगारांतर्फे त्यांचेही अभिनंदन करत आहोत.

– भाऊसाहेब पठाण, अध्यक्ष, राज्य सरकारी गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ.

हेही वाचा

Back to top button