ऊसतोडणी मशिनमालक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात; ‘हे’ आहे कारण | पुढारी

ऊसतोडणी मशिनमालक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात; 'हे' आहे कारण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ऊसतोडणी मशिनबाबत शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन न करता एका कंपनीने विक्री केलेल्या 42 ऊसतोडणी मशिनमध्ये बिघाड झाल्याने मशिनमालक त्रस्त झाले आहेत. सव्वाकोटी रुपयांचे तोडणी मशिन हे शासन अनुदानाविना खरेदी करून मशिन बंद राहण्याने बँकांच्या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे? असा प्रश्न उपस्थित करत 15 एप्रिलपासून साखर आयुक्तालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी मशिनमालक संघटनेने दिला आहे.

संघटनेचे सचिव अमोल जाधव यांच्यासह रजत नलवडे, श्रीरंग जगताप, अमर वाघ, संजय दिवेकर, शिवाजी पासलकर, जगन्नाथ चांडे, उज्ज्वला भोसले आदींच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त कुणाल खेमनार यांची साखर संकुलामध्ये गुरुवारी (दि.4) दुपारी भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. कंपनीकडून मशिन बनविताना देण्यात येत असलेल्या टेस्ट रिपोर्ट आणि शासनाच्या असलेल्या निर्बंधाचे पालन केलेले नसल्याचा दावा या वेळी चर्चेत करण्यात येत संबंधित कंपनीचा परवाना रद्द करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर साखर आयुक्त खेमनार यांनी या विषयावर लवकरच संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी मशिनमालक संघटनेने नव्या मशिनमधील नादुरुस्तीवर ग्राहक न्यायालयात दाद मागितल्याची माहिती जाधव यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button