भाजप कार्यकर्त्यांची ‘सागर’वर होणार बैठक; फडणवीस व हर्षवर्धन पाटील यांची उपस्थिती | पुढारी

भाजप कार्यकर्त्यांची ‘सागर’वर होणार बैठक; फडणवीस व हर्षवर्धन पाटील यांची उपस्थिती

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची मुंबईत शुक्रवारी (दि. 29) ’सागर’ निवासस्थानी बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा ही महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे गेली आहे. इंदापूर तालुक्यामध्ये अजित पवार गटाकडून भाजप नेते व कार्यकर्त्यांना खालच्या पातळीवरील भाषेमध्ये बोलून मानहानीचा प्रयत्न केला जात आहे.

या संदर्भासह इतर मुद्द्यांवर हर्षवर्धन पाटील यांची देवेंद्र फडणवीसांशी दि. 20 व 25 मार्च रोजी अशी दोनदा चर्चा झाली आहे. या वेळी अंकिता पाटील ठाकरे, राजवर्धन पाटील हेदेखील उपस्थित होते. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सध्या महाराष्ट्राचे नव्हे, तर देशाचे लक्ष लागून राहिले आहे. या मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीमध्ये ’काटे की टक्कर’ लक्षात घेता, महायुतीचे नेते या मतदारसंघाकडे विशेष लक्ष देत आहेत. हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर विधानसभेच्या मागील 4 निवडणुकांमध्ये दिलेला शब्द अजित पवार यांच्याकडून पाळला गेला नाही, याबद्दल त्यांची नाराजी इंदापूर तालुक्यातील गावोगावच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये सध्या दिसून येत आहे. इंदापूर विधानसभेची जागा भाजपकडे असावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे. देशातील हाय व्होल्टेज लढत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होत असल्याने देवेंद्र फडणवीस व हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या होणार्‍या या बैठकीकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा

Back to top button