मतदान ओळखपत्र कुठे मिळेल? प्रश्नावर अधिकाऱ्यांकडून टोलवा टोलवीचे उत्तरं | पुढारी

मतदान ओळखपत्र कुठे मिळेल? प्रश्नावर अधिकाऱ्यांकडून टोलवा टोलवीचे उत्तरं

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मतदान ओळखपत्र (ईपीक कार्ड) नवीन स्वरुपात आले. मात्र, मतदार यादी असूनही ते मिळालेले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क करून आमचे मतदान ओळखपत्र कधी आणि कुठे मिळेल, अशी विचारणा केली जात आहे. त्यावर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय किंवा मतदान नोंदणी अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे विचारणा करा, असे उत्तर दिले जात आहे. त्यांच्याकडे गेल्यानंतर तुमचे ओळखपत्र पोस्टाने आले असेल किंवा येईल, असे सांगून वेळ मारून नेली जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेने आपल्या कार्यालयात मतदारांच्या समस्या सोडविण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला. त्यावर दररोज 50 ते 60 फोन कॉल येत आहेत. त्यात ओळखपत्र मिळाले नाही, कसे मिळेल?, कुठे मिळेल? तसेच मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्र कुठे शोधायचे असे प्रश्न विचारले जात आहेत. नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी संकेतस्थळाचा पत्ता सांगितला जातो. मात्र, ओळखपत्रसाठी स्थानिक बीएलओ आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यालयात जाऊन चौकशी करण्याचा सल्ला मिळतो. त्याठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला घरी आले असेल, त्या वेळी तुम्ही घरी नसाल, असे उत्तर देऊन वेळ मारून नेली जात आहे.

मतदार यादी शुद्धीकरण आणि नवमतदार नोंदणी करणार्‍या मतदारांना अत्याधुनिक आणि सध्याचे छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र दिले जात आहे. दुरुस्ती अथवा नोंदणी केल्यानंतर एक ते दोन महिन्यांच्या आत पोस्टाने घर पोहोच ओळपत्र देणे आवश्यक आहे. परंतु, ओळखपत्र घर पोहोच मिळत नाही. त्यामुळे संबंधित बीएलओ आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात चौकशी केल्यानंतर घर पोहोच येईल, असे उत्तर मिळत आहे.

माजी नगरसेवकाकडे दिले ओळखपत्र

प्रभागातील नवीन मतदारांची ऑनलाइन नोंदणी राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करून घेतात. तसेच ही नावे यादीत येतील याची काळजीही घेतली जाते. नाव यादीत आल्यानंतर त्यांची मतदान ओळखपत्र पोस्टमनला किंवा बीएलओला हाताशी धरून आपल्या कार्यालयात जमा करून घेतात, अशी तक्रार काही कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे मतदारांना ओळखपत्र घर पोहोच का मिळत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

तीन वर्षांपूर्वी कोथरूड विधानसभा मतदारसंघात वास्तव्यास आले. त्यानंतर गावाकडील मतदार यादीतील नाव कमी करून येथील मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. त्यानुसार मतदार यादीत नाव आले. मात्र, मतदान ओळखपत्र अद्याप मिळालेले नाही. घरातील दोघांचे ओळखपत्र मिळाले असून, ओळखपत्राविषयी चौकशी केली असता, आले नाही, असे उत्तर संबंधितांकडून दिले जात आहे.

– विद्या गायकवाड, कोथरूड

हेही वाचा

 

Back to top button