World Climate Day Special | जगाला रेड अलर्ट : अस्वस्थता निर्देशांक वाढला | पुढारी

World Climate Day Special | जगाला रेड अलर्ट : अस्वस्थता निर्देशांक वाढला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जगात सर्वत्र हरितगृह वायूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अमेरिकेतील हवामान संघटनांनी संयुक्त राष्ट्र संघाला हा रेड अलर्ट कळविला आहे. त्यामुळेच कुठे खूप ऊन, कुठे थंडी, तर कुठे पाऊस, असे विचित्र हवामान उन्हाळ्यातही दिसत आहे. त्यामुळेच कमाल-किमान तापमानात मोठी दरी दिसत आहे. पृथ्वीच्या वातावरणामध्ये पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साइड, ओझोन, क्लोरोफ्लोरो कार्बन, हायड्रोफ्लोरो कार्बन असे आठ प्रकारचे हरितगृह वायू (ग्रीनहाऊस वायू)  आहेत.

मानवाच्या अतिहस्तक्षेपामुळे या वायूंचे प्रमाण खूप वाढले असून, त्याचा परिणाम आपण सतत या अनुभवत आहोत. त्यामुळेच हिमनद्या वितळत असून समुद्र, महासागरातील पाण्याचे तापमान सारखे वाढत आहे. त्यामुळे अमेरिकन हवामान संस्थांनी हा रेडअलर्ट संयुक्तराष्ट्र संघाला कळवला आहे. जागतिक हवामान संघटनेनेही याची दखल घेतली आहे.

अस्वस्थतेचा निर्देशांक वाढला

कमाल- किमान तापमानात झालेल्या वाढीमुळे हिट इंडेक्स अर्थात उष्मा घातांक वाढला आहे. या घटना भारतात जून महिन्यात जास्त होऊ शकतात, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. ज्या भागात ऊन आणि आर्द्रता जास्त आहे, अशा भागांना हा अलर्ट आहे. यात कोकण, मुंबई, ठाणे या भागांना अलर्ट दिला आहे. याचे वर्णन हवामान शास्त्रज्ञांनी ’अस्वस्थतेचा निर्देशांक’ असे केले आहे.

2023 ठरले सर्वात उष्ण वर्ष

जागतिक हवामान संघटनेने 2023 हे सर्वात उष्ण दशक म्हणून चिन्हांकित केले आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत असून महासागर, हिमनद्यांवर अभूतपूर्व बर्फ कमी होत आहे. जागतिक हवामान संघटनेने नुकताच आपला ’स्टेट ऑफ द क्लायमेट’ हा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये 2023 हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष ठरल्याची नोंद केली, त्याचा परिणाम 2024 या वर्षातही जाणवत आहे.

बारा महिन्यांत 1.5 अंशांची वाढ

युरोपियन युनियनच्या कोपर्निकस क्लायमेट सर्व्हिसच्या मते, मार्च 2023 ते फेब—ुवारी 2024 या 12 महिन्यांच्या कालावधीत कमाल तापमान 1.56 अंशसेल्सिअस इतकी सरासरी वाढ झाली. त्यामुळे बर्फ वितळणे, सागराचे तापमान लवकर वाढून अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले आहे.

अंटार्टिक महासागरात मोठे बदल

या अहवालात म्हटले आहे की, जगातील महासागराच्या पाण्यात उष्णतेच्या लाटा जास्त वाढल्या आहेत. महासागराच्या अभ्यासकांच्या मते 1950 पासून हिमनद्यांतील बर्फ वेगाने वितळत आहे. अंटार्क्टिक समुद्रातील बर्फाची आतापर्यंतची नीचांकी पातळी यंदा नोंदवली गेली.

हरितगृह वायू उत्सर्जनाचे खूप मोठे दुष्परिणाम जगाला भोगावे लागत आहेत. त्यामुळे 2023 या वर्षात अनेक हवामान बदलाच्या मोठ्या घटना बघायला मिळाल्या. हीट इंडेक्स वाढला की हीट-डीस-कम्फर्ट वाढतो. वातावरणातच अस्वस्थता वाढते. ज्या भागात आर्द्रता आणि ऊन जास्त आहे, तेथे अशा घटना वाढल्या आहेत.
– डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी,
निवृत्त हवामानशास्त्रज्ञ, आयएमडी, पुणे

अहवालाचे निष्कर्ष

  • उष्णतेच्या लाटा, पूर, दुष्काळ, जंगलातील आगीच्या घटनांत वाढ होणार
  • उष्णकटिबंधीय चक्रीवादळाच्या घटना वाढणार
  • हवामानशास्त्रज्ञांनी सध्याच्या परिस्थितीचे वर्णन ‘मेल्टडाऊन पॉइंट’ म्हणून केले आहे.
  • या घटनांचा परिणाम विमान वाहतुकीवर झाला आहे.

तज्ज्ञांनी सुचविलेले उपाय

  • अक्षय ऊर्जानिर्मिती, पवन, सौर,
  • जलस्रोतांवर ऊर्जानिर्मिती वाढवा
  • हे प्रयोग जगभरात जवळपास 50 टक्क्यांनी वाढले असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला
  • हरितगृह वायू कमी उत्सर्जित करा
  • हरित इंधनावरील वाहने निर्माण करा

हेही वाचा

Back to top button