बालविवाह पडला महागात; मुलीच्या आई-वडिलांसह आठ जणांवर गुन्हे दाखल | पुढारी

बालविवाह पडला महागात; मुलीच्या आई-वडिलांसह आठ जणांवर गुन्हे दाखल

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा : मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिचे लग्न लावून दिल्याप्रकरणी पोलिसांनी मुलीचे आई-वडील, नवरदेव, सासू-सासरे, भटजीसह 8 जणांवर, तसेच उपस्थित 40 ते 50 ग्रामस्थांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली. सोमतवाडी (ता. जुन्नर) येथे शनिवारी (दि. 16) एका मंगल कार्यालयात हा प्रकार घडला. याप्रकरणी अश्विनी सतीश नेहरकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचायत समिती विस्तार अधिकारी धेंडे व तालुका महिला संरक्षण अधिकारी भाग्यश्री लहू घाडगे, बाल संरक्षण अधिकारी यांच्याकडून सोमतवाडी येथील एका मंगल कार्यालयात बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार फिर्यादी यांनी ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्त्या, परिवेक्षक व पोलिसांसह मंगल कार्यालयात धाव घेतली. त्या वेळी अल्पवयीन मुलगी व नवरदेवाच्या आई-वडिलांना मुलीच्या वयाच्या पुराव्याची मागणी केला. त्यावर त्यांनी आदिमाया शक्ती विद्यालय इंगळून या शाळेचा शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत दाखविली. त्यात मुलीची जन्म तारीख 14/7/2005 होती. या दाखल्याबाबत शंका वाटल्याने मुलीच्या वयाची खात्री होत नाही तोपर्यंत लग्न लावू नका, असे सांगून अधिकारी तेथून बाहेर पडले. मात्र, त्यानंतर अधिकारी लग्न हॉलमध्ये परत येईपर्यंत लग्नाचा विधी पार पडला होता.

दरम्यान, मुलीच्या वयाबाबत मूळ कागदपत्रांची पाहणी व खात्री केली असता तिची जन्मतारीख 14/7/2007 अशी असून, वय 16 वर्ष 8 महिने इतके आहे. ती अज्ञान असल्याचे तिच्या आई-वडिलांना माहीत असूनदेखील त्यांनी तिचे लग्न लावून दिले. याप्रकरणी नवरदेवासह त्याचे आई-वडील, अल्पवयीन मुलीचे आई-वडील, चुलते, भटजी, मंगल कार्यालय मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्नर पोलिस याबाबत पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button