पुणे : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून सरकार आज पडणार, उद्या पडणार, असे भाकीत विरोधी पक्षाचे नेते करत आहेत. आमचे सरकार पाच वर्षे टिकेल आणि त्यानंतर पुन्हा सत्तेवर येईल, त्यामुळे त्यांनी निवांत रहावे, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना महात्मा फुले समता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मंत्रिपद येते आणि जाते. मात्र, लोकांसाठी जो लढतो आणि बोलतो, तो व्यक्ती लोकांच्या लक्षात राहतो. आज दोन वर्षांपूर्वी मी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, हे अजूनही काही लोकांना पचत नाही. काहीजण म्हणतात महाविकास आघाडीचे सरकार फेब्रुवारीमध्ये जाईल, काही म्हणतात जूनमध्ये जाईल; पण महाविकास आघाडीचे सरकार पूर्ण पाच वर्ष सत्तेत काम करेल आणि त्यानंतर पुन्हा निवडून येईल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.
कोरोनाचे कारण सांगत केंद्र सरकारने 2021 मध्ये होणारी जनगणना थांबवली. तर दुसरीकडे राज्याला इम्पेरीकल डाटा गोळा करा, असे सांगत आहे. नरेंद्र मोदी सांगतात मी ओबीसी आहे. मग इम्परिकल डाटा का देत नाहीत?, गप्प का बसले आहेत, असा सवाल उपस्थित केला. गुजरातचे चार सुपुत्र आहेत. दोन विकत आहेत आणि दोन खरेदी करत आहेत. काँग्रेसने काय केले विचारायच आणि त्यांच्या काळातील सर्व विकायला काढायचे हे काम सुरू आहे, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला.
छत्तीसगड सरकारने ओबीसींची जनगणना सुरू केला असून, आम्ही ही राज्यात जनगणना करणार आहोत. परंतु ती पूर्ण होईपर्यंत आमचे आरक्षण सुरू राहिले पाहिजे. आज जनावरांची जनगणना होत आहे. मात्र, आमची होत नाही. आम्हांला आमची संख्या कळली पाहिजे. अजूनही माझ्या मागच्या अडचणी संपल्या नाहीत. त्यांना वाटत हे सगळं केल्यावर ते आमच्याकडे येतील. पण, हे शक्य नाही. मी बदलू शकत नाही, अशा शब्दांत भाजप नेत्यांना सुनावले आहे.