शिरसोडी ते कुगाव मार्गावर ‘उजनी’तून पूल उभारणार : आमदार दत्तात्रय भरणे | पुढारी

शिरसोडी ते कुगाव मार्गावर ‘उजनी’तून पूल उभारणार : आमदार दत्तात्रय भरणे

वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील शिरसोडी ते करमाळा तालुक्यातील कुगावला जोडणारा मोठा पूल उभारण्यासाठी लवकरच निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामुळे इंदापूर तालुक्यातील नागरिकांना करमाळा तालुक्यात जाण्यासाठी सुमारे 70 किलोमीटर प्रवास करावा लागतो. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून आमदार भरणे यांच्याकडे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठा पूल उभारण्याची मागणी होत होती. त्यामुळे आमदार भरणे यांनी शुक्रवार (दि. 1) राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या पुलाबाबत मागणी केली.

त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले, या ठिकाणी उजनीच्या पाण्यातून पूल होण्याची गरज असून, त्यानुसार तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागास पूल उभारण्यासाठी अंदाजपत्रक बनवण्याचे आदेश दिले आहेत. येणार्‍या वर्षभरात पूल उभारला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. या पुलामुळे पुणे व सोलापूर जिल्हे जोडले जाणार आहेत. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्याकडे जाण्याचे अंतर कमी होणार आहे. शिवाय या पुलामुळे इंदापूर व करमाळा या दोन मोठ्या बाजारपेठा जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यांची प्रगती होण्यामध्ये पूल महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी माहिती आमदार भरणे यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button