सुतारवाडी भागातील बांधकामांवर महापालिका प्रशासनाकडून हातोडा | पुढारी

सुतारवाडी भागातील बांधकामांवर महापालिका प्रशासनाकडून हातोडा

बाणेर : पुढारी वृत्तसेवा : पाषाणमधील मुंबई-पुणे महामार्गावरील सुतारवाडी परिसरात विनापरवाना शोरूम, फर्निचर मॉल, हॉटेलवर बांधकाम विकास विभागाने पुन्हा एकदा जोरदार कारवाई केली. या कारवाईत सुमारे 3 लाख चौरस फूट बेकायदा बांधकाम
पाडण्यात आले. यापूर्वी या ठिकाणी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर काही दुकानदारांनी उच्च न्यायालयात दावा दाखल करून स्थगिती आदेश मिळविले होते. मात्र, 23 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने स्थगिती आदेश उठविले. यानंतर स्थानिक बंदोबस्त मिळवून आज कारवाई करण्यात आली. स्थगिती आदेश नंतर सहा दुकानदार सर्वोच्च न्यायालयात गेले होते.

त्यामध्ये आज स्थगिती आदेश मिळण्याची शक्यता असल्याने सकाळी लवकर कारवाई सुरू करण्यात आली. 6 पैकी 5 दुकानदारांवर यापूर्वी कारवाई करण्यात आली होती. ज्या दुकानदारांवर कारवाई झाली नव्हती त्यांच्यावर प्रथम कारवाई करण्यात आली. एकूण 20 दुकानांवर कारवाई करून सुमारे 3 लाख चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले. सदर बांधकाम ’एचईएमआरएल’ या संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रात येत आहे. या फर्निचर मॉलमुळे महामार्गावर वाहतुकीचा ताण येत होता. याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. पुढील आठवड्यात समोरील बाजूकडील दुकानांवर, हॉटेल, गॅरेजवर कारवाई करण्यात येणार आहे.

चतुःशृंगी पोलिस ठाण्याचा स्थानिक बंदोबस्त प्राप्त करून कारवाई करण्यात येईल तसेच कीर्ती गार्डन येथील फार्म हाऊसवरही कारवाई करण्यात येणार आहे, असे उपअभियंता सुनील कदम यांनी सांगितले. या कारवाईत कटर मशिन, दोन जेसीबी, गॅसकटर, ब्रेकर, 15 बिगारी व पोलिस कर्मचारी यांनी सहभाग घेतला. हिंजवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कारवाई अधीक्षक राजेश बनकर, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता सुनील कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे, समीर गडई यांनी पूर्ण केली.

हेही वाचा

Back to top button