मंगल कार्यालय चालकास ग्राहक आयोगाचा दणका | पुढारी

मंगल कार्यालय चालकास ग्राहक आयोगाचा दणका

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी पंधरावा संस्कार म्हणजे लग्न. मुलीच्या लग्नासाठी काळभोर दाम्पत्याने जोरदार तयारी सुरू केली. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार मुलीच्या लग्नाचा कार्यक्रम रद्द केला. त्यानंतर त्यांनी लग्नासाठी बुक केलेल्या लग्न कार्यालयाकडे डिपॉझिट स्वरूपात भरलेली रक्कम परत करण्याची मागणी केली. कार्यालयचालकांनी बुकिंग रकमेच्या बदल्यात दोन वर्षे मुदतीच्या क्रेडिट नोटचा पर्याय दिला. मात्र, काळभोर कुटुंबीयांना पैसे परत हवे असल्याने त्यांनी ग्राहक आयोगात धाव घेतली. अखेर आयोगाने दाम्पत्याच्या बाजूने निकाल देत डिपॉझिट स्वरूपात दिलेले दोन लाख रुपये व्याजासकट परत देण्याचा निकाल दिला.

शालिवाहन काळभोर यांनी 6 मार्च 2020 रोजी मगरपट्टा सिटी येथील मेस ग्लोबल लक्ष्मी लॉन्स 2 लाख रुपये देऊन मुलीच्या लग्नासाठी 18 व 19 मेसाठी बुक केले. यादरम्यान, कोरोनाचा शिरकाव वाढल्याने शासनाने देशभरात लॉकडाऊन जाहीर केले. शासनाच्या नियमावलीमुळे कार्यक्रम करणे शक्य नसल्याने काळभोर यांनी लग्न कार्यालयवाल्यांकडे बुक केलेली रक्कम परत देण्याची विनंती केली. बुकिंगपोटी दिलेली रक्कम कार्यालय परत करीत नसल्याने काळभोर यांनी एक्झिकन इव्हेंट्स मीडिया सोल्यूशन प्रा. लि. व मेस ग्लोबल लक्ष्मी लॉन्स यांना कायदेशीर नोटीस पाठवत ग्राहक आयोगात धाव घेत नुकसानभरपाईची मागणी केली.

इव्हेंट कंपनी व लग्न कार्यालयाने आयोगात बाजू मांडत आपणास कायदेशीर नोटीस मिळाली नसून तक्रारदाराची तक्रार खोटी असल्याचे नमूद केले. ते काळभोर यांना बुकिंगच्या बदल्यात क्रेडिट नोट देण्यास तयार होते. त्यांच्यासोबत झालेल्या ई-मेल संभाषणामध्ये कंपनीच्या परताव्याच्या नियमासंदर्भात कळविण्यात आले होते. तसेच, त्यांना दोन वर्षांच्या कालावधीपर्यंत क्रेडिट नोट देण्याचे मान्य केले होते. याखेरीज, संबंधित तक्रार आयोगास चालविण्याचा अधिकार नसून ती फेटाळण्याची विनंती त्यांनी आयोगाला केली.

नैसर्गिक आपत्तीत अनुचित व्यापारी प्रथा

नैसर्गिक आपत्तीत किंवा सक्तीच्या घटनांच्या अपवादात्मक परिस्थितीत रकमेचा परतावा देण्यात येईल, हे कंपनीने मान्य केले. त्यानुसार कोरोना ही जागतिक महामारी म्हणजेच नैसर्गिक आपत्तीच होती. काळभोर यांना रक्कम परत न करणे म्हणजे कंपनीने केवळ सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली नाही, तर अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे नमूद करीत कंपनी व लग्नकार्यालयाच्या चालकांनी वैयक्तिक व संयुक्तिकरीत्या काळभोर यांस दोन लाख रुपये 9 टक्के व्याजदराने 6 मार्च 2020 पासून सहा आठवड्यांत परत करावेत तसेच शारिरिक व मानसिक त्रास, तक्रारीचा खर्च, नुकसानभरपाईसाठी 50 हजार रुपये देण्याचा निकाल पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष राहुल पाटील, सदस्या सरिता पाटील, सदस्या क्षितिजा कुलकर्णी यांनी दिला.

हेही वाचा

Back to top button