शिवभक्तांना सर्व सुविधा पुरविण्याची व्यवस्था करा | पुढारी

शिवभक्तांना सर्व सुविधा पुरविण्याची व्यवस्था करा

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा :  किल्ले शिवनेरी येथे शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. शिवजयंती उत्साहात साजरी करीत असतानाच येणार्‍या शिवभक्तांना कोणत्याही असुविधांना सामोरे जावे लागू नये, यासाठी आवश्यक सेवासुविधा पुरविण्याची व्यवस्था करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. जुन्नर पंचायत समिती येथे शिवजयंती आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, उप वन संरक्षक अमोल सातपुते, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके, माजी आमदार शरद सोनवणे, पर्यटन विभागाच्या उपसंचालक शमा पवार, गृहरक्षक दलाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी हेमंत गरिबे आदी उपस्थित होते.

शिवजयंती हा आनंदोत्सव असून, त्यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते, असे सांगून डॉ. दिवसे म्हणाले, महसूल, पोलिस विभाग, वन विभाग तसेच अन्य विभागांची यात मोठी भूमिका आहे. यासह अन्य सर्वच यंत्रणांनी या उत्सवाचे व्यवस्थापन चांगल्याप्रकारे व्हावे यासाठी समन्वयाने काम करावे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा, मेगाफोन देण्यात येतील. हा उत्सव हरित असावा म्हणून प्लास्टिक नियंत्रण करावे तसेच कचरा जमा करण्याची व विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करा, असे निर्देशदेखील त्यांनी दिले.
गर्दी नियंत्रणासाठी मुख्य सभेचे ठिकाण बदलण्याविषयक भारतीय पुरातत्व विभागासोबत (एएसआय) चर्चा सुरू आहे. शिवजन्मस्थळ तसेच शिवकुंजची सजावट, रोषणाई, पायथा ते श्रीदत्त मंदिरापर्यंत पथदिव्यांसाठी वीज व्यवस्था चांगल्याप्रकारे करावी. गडावर तसेच तसेच श्रीदत्त मंदिर आणि पायथ्यासह शहरातील स्वच्छतागृहे आणि इतर स्वच्छताविषयक चांगले व्यवस्थापन करावे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या दुर्गोत्सवातील बचत गट आणि अन्य स्टॉल, टेन्ट सिटी, जाणता राजा महानाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम आदींबाबत माहिती, प्रसिद्धी करावी असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व्यवस्था आदींचा आढावा घेतला. डॉ. पंकज देशमुख म्हणाले, शिवभक्तांना कार्यक्रम सुरू असताना दर्शनासाठी अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागू नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत. फक्त मुख्य कार्यक्रमाच्या वेळी थोड्याच कालावधीसाठी गर्दीला थांबविण्यात येणार आहे. शिवजन्म उत्सव साजरा करत असताना गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने अत्यंत मर्यादित स्वरूपात प्रवेश पास देण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.

जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीस भाजपा तालुकाध्यक्ष संतोष खैरे, मराठा संघटनाचे पदाधिकारी, मराठा सेवा संघाचे गणेश महाबरे, अ‍ॅड. राजेंद्र बुट्टे पाटील, मंदार बुट्टे पाटील तसेच विविध कार्यान्वयन यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

गडावरील सुविधांची जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी

तत्पूर्वी, पहाटे जिल्हाधिकारी डॉ. दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण आणि पोलिस अधीक्षक देशमुख, उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी शिवनेरी गडावर भेट देऊन तेथील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्यासह वन विभाग, पोलिस, महावितरण, पंचायत समिती, एएसआय आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Back to top button