अतकरवाडीची स्मशानभूमी अडकली लालफितीत; ग्रामविकासमंत्र्यांचे आश्वासन ठरले फोल | पुढारी

अतकरवाडीची स्मशानभूमी अडकली लालफितीत; ग्रामविकासमंत्र्यांचे आश्वासन ठरले फोल

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड पायथ्याच्या घेरा सिंहगड अतकरवाडी (ता. हवेली) येथील स्मशानभूमी अद्यापही लालफितीत अडकली आहे. स्मशानभूमी नसल्याने आदिवासी समाजासह इतरांना रस्त्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात 4 ऑगस्ट 2023 रोजी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी तीन महिन्यांत स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप स्मशानभूमीच्या मंजुरीसाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. वनविभागाच्या जागेवर स्मशानभूमी उभारण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी महसूल विभागाकडून मंजुरीचा प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे स्मशानभूमीसाठी जागा मंजूर करण्यात आलेली नाही.

आमदार भीमराव तापकीर यांनी याबाबत विधानसभेत शासनाचे लक्ष वेधले होते. त्या वेळी ग्रामविकासमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते हवेतच विरले आहे. अतकरवाडी व परिसराची लोकसंख्या जवळपास तीन हजारांहून अधिक आहे. यात आदिवासी समाजाची लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधीसाठी रहिवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेक वर्षांपासून स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित आहे. सिंहगड किल्ल्यावर जाणार्‍या डोणजे -अतकरवाडी रस्त्यावर अतकरवाडी येथील ओढ्यालगत अंत्यसंस्कार केले जात आहेत.

जोरदार पावसामुळे ओढ्याला पूर आल्यावर मुख्य रस्त्यावर अंत्यसंस्कार केले जातात. पुणे (भांबुर्डा) वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ म्हणाले, महसूल विभागाने स्मशानभूमीच्या जागेचा प्रस्ताव वनविभागाला सादर केला नाही, त्यामुळे त्यावर कार्यवाही झाली नाही. माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, घेरा सिंहगडचे माजी सरपंच पांडुरंग आदींसह ग्रामस्थांनी स्मशानभूमीबाबत वन व महसूल विभागाला साकडे घातले होते. माजी सरपंच पांडुरंग सुपेकर म्हणाले, महसूल विभागाचे अधिकारी जागेची पाहणी करून गेले. त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे प्रस्ताव दिला आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे स्मशानभूमीचा प्रश्न अद्याप कागदावरच आहे.

हेही वाचा

 

Back to top button