महत्वाची बातमी : कोरोना रुग्णांना अँटिबायोटिक, स्टेरॉईड सरसकट देऊ नका | पुढारी

महत्वाची बातमी : कोरोना रुग्णांना अँटिबायोटिक, स्टेरॉईड सरसकट देऊ नका

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या रुग्णांना सरसकट अँटिबायोटिक देऊ नये. दुस-यांदा संसर्गाची शक्यता आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये आवश्यकता असल्यासच अँटिबायोटिक वापरावे. स्टेरॉईडचा वापर अ‍ॅडमिट व ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांना आवश्यकतेप्रमाणे करावा, असा निर्णय राज्यस्तरीय कोव्हिड टास्क फोर्सच्या शुक्रवारच्या बैठकीत घेण्यात आला. डॉ. रमण गंगाखेडकर यांचे अध्यक्षतेखाली कोव्हीड टास्कफोर्सची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. माधुरी कानिटकर, डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. वर्षा पोतदार, डॉ. डी.बी. कदम, डॉ. संजय पुजारी उपस्थित होते.

कोव्हीड पॉझिटिव्ह परंतु लक्षणे अथवा सहव्याधी नसणा-या रुग्णांना अँटीव्हायरल औषधे देण्याची आवश्यकता नाही. त्यांना लक्षणानुसार उपचार करण्यात यावेत. सहव्याधी असणा-या कोरोना रुग्णांना उपचारासाठी तीन दिवसांसाठी रेमडिसिव्हिर किंवा पाच दिवसांसाठी रिटोनाव्हिर किंवा मॉलनुपिराव्हिर ही औषधे वापरावीत, असेही नमूद करण्यात आले.

कोरोनाच्या जेएन. 1 व्हेरिएंटची लक्षणे आयएलआय किंवा सारी या प्रकारात येऊ शकतात. आयएलआय रुग्णांमध्ये ताप, सर्दी, खोकला इ. फल्यूसारखी लक्षणे असू शकतात. सारीच्या रुग्णांमध्ये वरील लक्षणांसोबत खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे इत्यादी लक्षणे असू शकतात. त्यामुळे त्यांना सरसकट अँटिव्हायरल, अँटिबायोटिक, स्टेरॉईड देणे टाळावे, सरसकट एचआरसीटी, रक्तचाचण्या करु नये, असे आवाहन करण्यात आले.

मृतदेह नातेवाइकांकडे द्यावेत

कोविड रुग्णांचे मृतदेह अंत्य संस्कारासाठी महानगरपालिकेला, नगरपरिषदेकडे अंत्यविधीसाठी देण्याची आवश्यकता नसून इतर आजाराने मृत्यू पावलेल्या व्यक्तींप्रमाणेच त्यांचे मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात यावेत, असाही निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा

Back to top button