काय सांगता? तुमची कार आता रिमोटवरही धावेल | पुढारी

काय सांगता? तुमची कार आता रिमोटवरही धावेल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : तुमच्याकडे कोणतीही कार असू द्या त्यावर फक्त एक मोठे रिमोट सेंसिंग किट बसवले की ती कारचालक नसताना रिमोटवर चालू लागते. त्यावर बंदूक, रॉकेट लॉन्चर अन् बरेच काही लादून ती अतिशय संवेद?शील प्रसंगात वापरता येऊ शकते. पाषाण भागातील डीआरडीओने भरवलेल्या प्रदर्शनात ही कार सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी झाले. हे प्रदर्शन निमंत्रितांसाठी आहे. डीआरडीओमध्ये संशोधनाच्या विविध शाखा आहेत.

त्यातील अहमदनगर येथील वाहन संशोधन विभागाने हे अनोखे किट तयार करण्यात यश मिळवले आहे. या प्रदर्शनात देशभरातील विविध शहरांतील संरक्षणविषयक उत्पादने तयार करणार्‍या स्टार्टअपच्या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. शैलेंद्र गाडे व डॉ. मकरंद जोशी यांच्या प्रमुख उपस्थित झाले. या प्रदर्शनात डीआरडीओची ही कार गर्दी खेचून घेत होती.

अहमदनगरमध्ये तयार झाले रोबोटीक कार किट

मानवरहित कार आपण पाहिली आहे. पण आहे ती कारच मानवरहित चालवता येईल काय यावर संशोधन सुरू होते. त्यात डीआरडीओला यश आले. तुमच्या कारच्या स्टेअरिंगवर डीआरडीओचे हे किट बसवले की तिचा ताबा रिमोट सेंसरच्या ताब्यात जातो. त्यामुळे हा कार मानवरहित चालू लागते. कारच्या वर मिसाईल, बंदूक लावून समोरील शत्रूचा अचूक वेध घेऊन त्यावर गोळीबार अथवा मिसाईल डागता येते.

हे किट अहमदनगरच्या व्हेईकल रिसर्च डेव्हलपमेन्ट या प्रयोगशाळेत तयार झाले. ते भारतात पहिल्यांदा तयार झाले आहे. याचे पेटंटसाठी अर्ज केला असून, ते प्रतीक्षेत आहे. याला रोबोटीक कार किट असे नाव असून, त्यात शेकडो मायक्रो कंन्ट्रोलर वापरले आहेत. कारचा ब्रेक,अक्सलरेटर, गतीसह यातील कॅमेरा 360 अंशांच्या कोनातून बघतो. तो अष्टावधानी आहे. युध्दात आपत्कालीन परिस्थितीत हे वापरले जाऊ शकते. सध्या हे लष्करासाठीच तयार केले आहे.

– मनीष साहू, शास्त्रज्ञ, व्हेईकल रिसर्च डिव्हीजन, डीआरडीओ, अहमदनगर

हेही वाचा

Back to top button