आकर्षक फुलांच्या सजावटीने फुलुन आला जयस्तंभ | पुढारी

आकर्षक फुलांच्या सजावटीने फुलुन आला जयस्तंभ

कोरेगाव भीमा : पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव भीमा-पेरणे फाटा (ता. हवेली) येथील 1 जानेवारी रोजी होणाऱ्या 206 वा जयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी जोमात सुरू आहे. रविवार (दि. 31) अखेर ही तयारी पूर्ण झाली आहे. 75 फूट उंच जयस्तंभास चारही बाजूंनी साडे चार टन वजनाच्या विविध पाना-फुलांची आकर्षक सजावट क्रेनच्या सहाय्याने करण्यात आली आहे. यामध्ये शेवंती, अष्टर, झेंडू व अशोकाचा पाला वापरण्यात आला आहे.

जयस्तंभास खालच्या बाजूने झेंडूच्या फुलांच्या माळा, त्याच्यावर डॉ. बाबासाहेब व त्यांचे सहकारी यांचा फोटो, शेजारील दोन बाजूंना अशोकाच्या हिरव्या रंगाच्या पानामध्ये ‘द महार रेजिमेंट’चा लोगो, त्यानंतर वरच्या बाजूस पिवळ्या फुलांची सजावट केली असून त्या पिवळ्या फुलांवर समोरील बाजूस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्यात आला आहे. दोन बाजूंनी संविधानाचे फोटो लावण्यात आले आहे. जयस्तंभाच्या वरील बाजूने भगवा, पांढरा व हिरव्या रंगामध्ये तिरंगा ध्वजाची प्रतिमा फुलांमध्ये तयार करत मध्यभागी पांढऱ्या फुलांवर अशोकचक्र लावत आकर्षक अशी सजावट पूर्ण करण्यात आली आहे.

अगदी दूरवरून पाहिले तरी मन तृप्त होईल असे दर्शन घडत आहे. या सजावटीसाठी मागील दोन दिवसांपासून तब्बल 40 कामगार दिवसरात्र मेहनत करत होते. जयस्तंभाची ही आकर्षक सजावट पाहण्यासाठी भीम अनुयायांची सकाळपासूनच गर्दी केल्याचे पाहण्यास मिळाले. आकर्षक अशी सजावट पाहत अनेकांनी हे दृश्य आपापल्या फोनमध्ये देखील टिपून घेताना पाहण्यास मिळाले.

हेही वाचा

Back to top button