पाठलाग करून दरोडेखोर जेरबंद; मिरजगाव पोलिसांची कारवाई | पुढारी

पाठलाग करून दरोडेखोर जेरबंद; मिरजगाव पोलिसांची कारवाई

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : लग्नसमारंभामध्ये वर्‍हाडी म्हणून मिरवून हात साफ करणारी, तसेच दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा दरोडेखोरांना मिरजगाव पोलिसांनी जेरबंद केले. त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील मांदळी येथील आत्मगिरी लॉन्स, थेरगावचे शिवपार्वती मंगल कार्यालयातील लग्नसमारंभात चोर्‍या होण्याचे प्रकार वाढले आहेत. याप्रकरणी मिरजगाव पोलिसांनी गुन्हेही दाखल केले आहेत.

सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना मिळालेल्या माहितीनुसार दरोडा टाकण्याच्या तयारीत असेलेली सहाजणांची टोळी पांढर्‍या रंगाच्या स्कॉर्पिओमधून मिरजगाव येथील क्रांती चौकातून आष्टीकडे जाणार आहे. ही माहिती मिळताच दिवटे यांनी पोलिस पथक घेऊन क्रांती चौकात नाकाबंदी केली. दरम्यान, काही वेळाने कोकणगावच्या दिशेने एक संशयित स्कॉर्पिओ येताना दिसताच, तिला थांबविण्यासाठी पोलिस पथकाने हात केला. स्कॉर्पिओ नाकाबंदी तोडून कड्याच्या दिशेने गेली. यानंतर पोलिस पथकाने पाठलाग केला. गतिरोधक येताच स्कॉर्पिओ पकडली.

स्कॉर्पिओची झडती घेतली असता, पोलिस पथकाला लोखंडी सुरा, दोन लोखंडी गज, एक बांबूचे दांडके व मिरचीची पूड आढळून आली. यानंतर पोलिसांनी संतोष प्रभाकर खरात (रा भटेवाडी (ता. जामखेड), आकाश रमेश गायकवाड (गोरोबा टॉकीज, जामखेड), विशाल हरीश गायकवाड, किरण आजिनाथ गायकवाड, रवी शिवाजी खवळे, संतोष शिवाजी गायकवाड (सर्व रा. मिलिंदनगर, जामखेड) यांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता, दरोडेखोरांनी मिरजगाव परिसरातील मंगल कार्यालयांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली.

या दरोडेखोरांकडून 24 हजारांची रोकड, नऊ ग्रॅम वजनाचे सोने, काही मोबाईल व स्कॉर्पिओ (क्र.एमएच 12 एनई 8906) असा एकूण सात लाख 80 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, फौजदार सुनील माळशिकारे, गणेश ठोंबरे, विकास चंदन, सुनील खैरे, गोकुळदास पळसे, गंगाधर आंग्रे, राजेंद्र गाडे, राहुल सपट यांच्या पथकाने केली.

टोळीकडून अन्य गुन्ह्यांचाही तपास

मिरजगाव पोलिसांनी पकडलेल्या या सहा दरोडेखोरांची वरात थेट जेलमध्ये गेली आहे. या टोळीने अनेक ठिकाणी चोर्‍या केल्या असून, इतरही गुन्ह्याच्या तपास लागेल, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button