Pune : पानशेतच्या खानापूर पुलाचे काम अर्धवटच | पुढारी

Pune : पानशेतच्या खानापूर पुलाचे काम अर्धवटच

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आलेल्या पुणे-पानशेत रस्त्यावरील खानापूर मणेरवाडी (ता. हवेली) येथील पुलाचे काम सरत्या वर्षातही अर्धवट आहे. त्यामुळे पर्यटकांसह नागरिकांचे हाल सुरू आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे गेल्या चार वर्षांपासून पुलाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. पुलाचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे बांधकाम विभाग सांगत आहे. मात्र, प्रत्यक्षात पुलाचे काम अर्धवटच आहे. खोल ओढ्यावर पुलाचे स्लॅब टाकून त्यावर खडी टाकली आहे. त्यामुळे खड्डे आणि खडीतून वाहतूक सुरू आहे.

हायब्रीड अ‍ॅम्युनिटी योजनेतून नांदेडपासून पानशेतपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण, तर काही ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात आले. दोन्ही बाजूचा रस्ता चकाचक झाला. त्यामुळे वाहने वेगाने धावत आहेत. खानापूर पुलावर मात्र, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. संबंधित ठेकेदाराने पुलाचे काम अर्धवट सोडल्याने नवीन ठेकेदार नेमून उर्वरित काम करणार असल्याचे बांधकाम विभाग वर्षभरापासून सांगत आहे. पानशेत, वरसगाव तसेच राजगड, तोरणा, वेल्हे भागाला जोडणार्‍या रस्त्यावरील खानापूर हा मुख्य पूल आहे. दोन वर्षांपूर्वी जुना पूल पुरात बुडाल्याने काही काळ वाहतूक बंद झाली होती. त्या वेळी बांधकाम विभागाने वेगाने ओढ्यावर पुलाचे स्लॅब टाकले. मात्र, त्यावर डांबरीकरण अथवा काँक्रिटीकरण केले नाही. त्यामुळे पुलावर खड्डे पडून चाळण झाली असून, पर्यटक, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

मोठ्या दुर्घटनेची टांगती तलवार
खोल ओढ्यावर पूल असल्याने वाहने ओढ्यात कोसळून मोठ्या दुर्घटनेची टांगती तलवार उभी आहे. कच्च्या पुलावरून ये-जा करणार्‍या वाहनांमुळे परिसरात धुळीचे लोट पसरत आहेत. त्याचा विद्यार्थी, पादचार्‍यांसह परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी बांधकाम विभागाने तातडीने पुलाचे काम सुरू करण्याची मागणी स्थानिक मावळा संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण दारवटकर, मणेरवाडीच्या सरपंच अनिता थोपटे, खानापूरचे माजी सरपंच शरद जावळर आदींनी केली आहे.

खानापूर पुलासह इतर अर्धवट पुलांची अर्धवट कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच रांजणे -पाबे घाट रस्त्यावरील धोकादायक दरडी संरक्षित कराव्यात.
                                                 -किसनराव जोरी, माजी उपसभापती, हवेली पं.स.

Back to top button