वायूप्रदूषणाचे दुष्परिणाम ; ज्येष्ठांसह लहान मुले, महिलाही बेजार | पुढारी

वायूप्रदूषणाचे दुष्परिणाम ; ज्येष्ठांसह लहान मुले, महिलाही बेजार

पुणे : दिवाळीतील वायुप्रदूषणामुळे शहरातील प्रत्येक घरातील किमान एकाला सर्दी, डोकेदुखीसह श्वसनाच्या विकारांनी घेरले आहे. प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाच्या विकारांनी ग्रासल्याचे मत शहरातील डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. दिवाळीत झालेले वायुप्रदूषण इतके भयंकर होते, की ते कमी होण्यास किमान आठ दिवस लागले. मात्र, शिवाजीनगर व लोहगाव या भागांची हवा अजूनही खराब श्रेणीत आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क घालूनच जावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
यंदाच्या दिवाळीत शहरातील वायुप्रदूषणाने कळस गाठला होता. दिल्लीपाठोपाठ पुणे शहराने नंबर लावत देशात सर्वाधिक प्रदूषित दिवाळीची नोंद केली. शहरातील हवेची गुणवत्ता लक्ष्मीपूजनाच्या दुसर्‍या दिवशी 12 नोव्हेंबर रोजी अतिखराब गटात गेली होती. त्यामुळे दिवाळीतच अनेक जण आजारी पडले. घसा खवखवणे, डोळ्यांची आग व खाज सुटणे, नाक चोंदणे, पाणी गळणे असे त्रास सुरू झाले. अनेकांनी दिवाळीतच दवाखाना गाठला. मात्र, तो त्रास पंधरा दिवस होत आले, तरी थांबता थांबेना, असे मत शहरातील डॉक्टारांंनी व्यक्त केले. फटाक्यांच्या धुरामुळे ज्येष्ठ नागरिकांना न्यूमोनियासारख्या आजारांनी ग्रासल्याने त्यांना वारंवार दावाखान्याच्या वार्‍या कराव्या लागत आहेत.

या संस्था शहरासाठी सतत काम करीत आहेत; पण

पुण्यातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ-गांधीनगर आणि पर्यावरण शिक्षण केंद्र यांनी अलीकडेच स्थानिक तज्ज्ञांना एकत्र आणले आहे. राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम  सुरू केला. यात 2024 पर्यंत 20 ते 30 टक्क्यांनी प्रदूषणपातळी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. 122 शहरांमध्ये जेथे सध्याची वायुप्रदूषण पातळी राष्ट्रीय आरोग्य-आधारित मानकांपेक्षा जास्त आहे, त्या शहरात दिल्लीनंतर पुणे शहर आघाडीवर आहे. मात्र, वाढती लोकसंख्या, वाहनसंख्या आणि त्यामुळे वाढणारे प्रदूषण आवाक्याबाहेर जात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

प्रदूषणाने सर्व मानके मोडली

पुण्यातील हवेची गुणवत्ता  खराब होण्याचे मुख्य कारण मानवी हस्तक्षेप हेच आहे. केंद्रीय पातळीवर काम करणार्‍या संस्थांच्या मते पुणे येथे सुमारे 70 लाख लोक एकत्र येतात. त्यात स्थानिक 40 ते 60 लाख, तर बाहेरील सुमारे 10 लाख लोकांचा समावेश असतो. अलिकडच्या वर्षांत शहराचा विकास झपाट्याने झाला आहे. शहरातील हवेची गुणवत्ता हे एक मोठे आव्हान आहे. सूक्ष्म कणांची पातळी  भारतीय मानके आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा जास्त आहे.

रक्तवाहिन्यांचे आजार सर्व गटांना होत आहेत…

तरुण, वृद्ध व्यक्तीत श्वसन, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग असलेल्या लोकांसह सामान्यांनाही त्रास होत आहे. शहरातील सार्वजनिक आरोग्यावर वायुप्रदूषणाचा मोठा परिणाम दिसत असून, हजारो लोकांना श्वसनाचे आजार आणि प्रदूषित हवेमुळे होणारे अकाली मृत्यू यांचे प्रमाण वाढल्याचे संशोधन संस्थांचे निरीक्षण आहे. पुण्यातील वायुप्रदूषणामुळे होणारे नुकसान लक्षणीय आणि वाढत आहे आणि शहरातील सर्वांत असुरक्षित रहिवाशांचे रक्षण करण्यासाठी तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे, असेही मत या संशोधन संस्थांच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.
दिवाळीतील प्रदूषणाचा त्रास अजूनही नागरिकांना होत आहे. प्रदूषणामुळे विषाणुजन्य आजारात खूप मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे एन्फ्लुएन्झासारखे आजार वाढले आहेत. यात खोकला दोन ते तीन आठवडे राहतो आहे. व्यवस्थित उपचार घेतले तर तो बरा होतो. मात्र, तो पंधरा दिवस त्रास देतो. ज्येष्ठ नागरिकांसह महिला व मुलांना जास्त त्रास होत आहे.
 – डॉ. अमित द्रविड,  विषाणुजन्य आजारतज्ज्ञ, भांडारकर रस्ता
दिवाळीतील प्रदूषणाचा त्रास अजूनही नागरिकांना होत आहे. प्रदूषणामुळे विषाणुजन्य आजारात खूप मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे एन्फ्लुएन्झासारखे आजार वाढले आहेत. यात खोकला दोन ते तीन आठवडे राहतो आहे. व्यवस्थित उपचार घेतले तर तो बरा होतो. मात्र, तो पंधरा दिवस त्रास देतो. ज्येष्ठ नागरिकांसह महिला व मुलांना जास्त त्रास होत आहे.
 – डॉ. अमित द्रविड, विषाणुजन्य आजारतज्ज्ञ, भांडारकर रस्ता
हेही वाचा

Back to top button