Pune News : सातगाव पठार भागात कांदा लागवड सुरू | पुढारी

Pune News : सातगाव पठार भागात कांदा लागवड सुरू

पेठ : पुढारी वृत्तसेवा :  सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात कांदा लागवड सुरू झाली आहे. बटाटा पीक काढून झाल्याने शेतकर्‍यांनी आता शेतात कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू केली आहे. मात्र, कांदा लागवडीवेळी विजेच्या लपंडावामुळे शेतकर्‍यांना मोठी कसरत करावी लागत असून, महावितरण कंपनीच्या या गलथान कारभारामुळे शेतकरीवर्गात मोठी नाराजी पसरली आहे. सातगाव पठारावरील जवळपास 4 हजार एकरमध्ये बटाटा लागवड केली होती. नुकतीच बटाटा काढणी झाल्याने मोकळ्या झालेल्या शेतात शेतकर्‍यांनी कांदा लागवडीची तयारी केली. कुरवंडी, थुगाव, भावडी, कारेगाव, पेठ, पारगाव परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी आवश्यक ती मशागत करून कांदा लागवड सुरब केली आहे. शेतकरी लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. अनेक शेतकर्‍यांनी दीड महिन्यापूर्वीच घरगुती कांदा बियाणे प्रति 2 हजार रुपये किलो दराने घेऊन रोपे तयार केली आहेत. ती आता लागवडीयोग्य झाली आहेत.

ऑक्टोबर हीटमुळे उष्णता वाढली असून, शेतात पाणी जादा लागत आहे. मात्र, वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून, कांदा लागवडीवेळी पाण्याने वाफे भरणे अवघड जात आहे. त्यामुळे मजुरांनाही तिष्ठत बसावे लागत आहे. कांदा लागवड वेळेत होत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचा आणि मजुरांचा वेळ वाया जात आहे. त्यामुळे कांदा लागवडीसाठी वाढीव दिवस जात असून, मजुरी द्यावी लागत आहे.

मजुरांचा तुटवडा
सध्या मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच प्रतिमजूर 350 रुपये इतकी मजुरी द्यावी लागत आहे. खेड, मंचर, नारायणगाव येथून मजुरांना जीप किंवा टेम्पोतून आणावे लागते. यासाठी 2 हजार रुपये गाडीभाडे शेतकर्‍यांना द्यावे लागत आहे. एक एकर कांदा लागवड करण्यासाठी शेतकर्‍यांना 10 ते बारा मजूर घेऊन किमान दीड ते दोन तास लागतात. त्यात वीज गेल्यावर मजुरी वाया जाते किंवा जास्त वेळ कामाचे गेले, तर मजुरी वाढवून द्यावी लागत आहे. तसेच मजुरांना चहा, नाष्टा व जेवणही द्यावे लागत असल्याने अधिक खर्च होत आहे, असे शेतकरी विशाल कराळे, वसंतराव एरंडे व सोपानराव गणपत नवले यांनी सांगितले.

 

Back to top button