औषधांसाठी अजूनही ‘बाहेरचा रस्ता’ ; ससूनचा दावा फोल | पुढारी

औषधांसाठी अजूनही ‘बाहेरचा रस्ता’ ; ससूनचा दावा फोल

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  रुग्णांना बाहेरून औषधे विकत घेण्यासाठी पदरमोड करावी लागू नये, यासाठी ससून रुग्णालयामध्ये फेब—वारीपासून झीरो प्रिसक्रिप्शन पॉलिसी राबविण्याचा निर्णय झाला. सर्व औषधे रुग्णालयामध्येच मोफत उपलब्ध होतील, असा दावा प्रशासनाने केला. मात्र, प्रत्यक्षात सात महिन्यांनंतरही रुग्णांना बहुतांश औषधे बाहेरूनच घ्यावी लागत असल्याचे दै. दपुढारी’ने केलेल्या पाहणीतून दिसून आले आहे.

अस्थिरोग विभाग

‘डॉक्टरच म्हणाले, औषधं बाहेरून घ्या…’ कंबर दुखतेय एक-दोन आठवड्यांपासून सांगणार्‍या रुग्णासाठी डॉक्टरांनी न तपासणी करता केवळ प्रश्न विचारून प्रिस्किप्शनवर गोळ्यांची यादी लिहिली. ‘पंचावन्न’मध्ये जा आणि औषधे घ्या, न मिळणारी औषधे बाहेरून घ्या, डॉक्टरांनी सल्ला दिला. ‘पंचावन्न’मध्ये पाच औषधांपैकी दोन औषधे बाहेरून घेण्याचे फार्मासिस्टने सांगितले. ससून रुग्णालयातील हा प्रसंग आहे गुरुवारचा.

साडेदहा वाजता रुग्णालयात केसपेपर काढण्यासाठी रांगेत उभा राहिल्यानंतर पंधरा मिनिटांनी केसपेपर मिळाला, अस्थिरोग विभागात जाण्यास सांगितले. केसपेपर देणार्‍या कर्मचार्‍यांनी नवीन इमारतीमध्ये 35 नंबरमध्ये जाण्यास सांगितले. अस्थिरोग विभागाची 35 क्रमांकाची ओपीडी शोधाशोध सुरू केली. तीन सुरक्षा रक्षकांना विचारल्यानंतर जुन्या इमारतीपासून लांब असलेल्या नवीन चकाचक इमारतीमध्ये पोहोचल्यानंतर डाव्या बाजूला जन्म-मृत्यू नोंद विभाग होता. तेथील सुरक्षा रक्षकांनी सांगितल्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या 35 क्रमांकामध्ये गेल्यानंतर पुन्हा सुरक्षा रक्षकच. हातामध्ये काठी घेऊन बसलेल्या सुरक्षा रक्षकाने केसपेपर घेऊन बसण्यास सांगितले. तीन ते चार मिनिटांतच सुरक्षा रक्षकाने नाव घेऊन ओपीडीमध्ये पाठवले. समोर तीन टेबल. त्यापैकी दोन टेबलवर सहा ते सात डॉक्टर हे रुग्णांची तपासणी करीत होते. तपासणी म्हणजे प्रश्न-उत्तरे. काही रुग्णांना चालून दाखवा, हात वर करून दाखवा, तर एक डॉक्टर खिडकीच्या प्रकाशात एक्सरे बघून रुग्णाला मार्गदर्शन करत होते.

कान-नाक-घसा विभाग

साधे कानासाठीचे ड्रॉप्सही मिळेना!

एका कानाने कमी ऐकू येत असल्याने ससून रुग्णालयातील डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांनी कान तपासला, मात्र औषधासाठी जे ड्रॉप्स प्रिस्किप्शनवर लिहून दिले ते ड्रॉप्स ससूनच्या औषध भांडारामध्ये उपलब्धतच नव्हते. ससूनच्याच आवारात एका मेडिकल स्टोअरमध्ये चौकशी केल्यानंतर त्याची किंमत पाचशे रुपये असल्याचे सांगण्यात
आल्याचा अनुभव दै. ‘पुढारी’च्या पाहणीत आला.

सकाळी सव्वादहा वाजता केस पेपर काढण्यासाठी 57 क्रमांकाची खिडकीवर थांबलो. त्याठिकाणी 25 मिनिटांनी केसपेपर मिळाले. त्यावर 70 क्रमांकाची ओपीडीमध्ये जाण्यास लिहून देण्यात आले. आता ही 70 क्रमांकाची ओपीडी कुठे आहे, असे सुरक्षा रक्षकाला विचारले. त्याने जिन्याने पहिल्या मजल्यावर जाण्यास सांगितले. एकाच जिन्यावरून  ये-जा करणारे रुग्ण आणि नातेवाइकांची गर्दी त्यामुळे थोडा वेळ थांबून मार्ग काढत 70 क्रमांकांची ओपीडी गाठली. त्या ठिकाणी सुमारे 20 रुग्ण रांगेत बसले होते. नाव नोंदवल्यानंतर रांगेत बसलो. साडेअकरा वाजता डॉक्टरांच्या समोर जाता आलं.

निम्मी औषधे बाहेरील मेडिकलमधून आणा…
55 नंबर औषधालयाबाहेर सकाळी 11 च्या सुमारास पाहणी केली. औषधालयाबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या. औषधालयाच्या खिडकीशेजारी बराच वेळ उभे राहून येथे पाहणी केल्यानंतर प्रत्येक रुग्णाला एक ते दोन औषधे दिल्यानंतर उर्वरित औषधे बाहेरून आणण्यास सांगितले जात होते.

Back to top button