संगमतीरी फुलली तैवान पेरूची शेती | पुढारी

संगमतीरी फुलली तैवान पेरूची शेती

राजेंद्र खोमणे

नानगाव : वडिलांचा शेतीमधील अनुभव आणि सुशिक्षित तरुण शेतकर्‍याची कल्पनाशक्ती, मेहनत, कष्ट आणि अभ्यासपूर्ण माहिती यांचा भीमा व मुळा-मुठा नदीतीरावर संगम झाला आणि यातून साकारली तैवान पिंक पेरूची बाग. वाळकी-संगमबेट (ता. दौंंड) येथील प्रगतशील शेतकरी संजय किसनराव थोरात यांनी तैवान पिंक पेरूची लागवड केली आणि पहिल्याच वर्षी त्यांना चांगला आर्थिक फायदा झाला आहे. सध्या त्यांची पेरूची बाग परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. संजय थोरात यांनी यंदाच्या वर्षी दोन एकर शेतात तैवान पिंक या जातीच्या पेरूच्या 1600 रोपांची सेंद्रिय पद्धतीने लागवड केली.
नदीकाठची चांगली व सुपीक जमीन असल्याने ठिबक सिंचनाचा वापर केला. बागेमध्ये सेंद्रिय निविष्ठांचा वापर करण्यात येत आहे. फळ थोडे मोठे झाल्यावर त्याला डंक माशीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी फोमजाळी व त्यावर प्लास्टिक पिशवी बांधली जात आहे. झाडांच्या फांद्यांच्या आधारासाठी तारा लावून मंडप तयार करण्यात आला आहे. थोरात यांच्या या पेरूच्या शेतामधून आत्तापर्यंत चार तोडे झाले असून, यामधून जवळपास 8 टन पेरूचे उत्पन्न निघाले आहे. हा पेरू गुजरात व तामिळनाडू येथील खासगी कंपनीमार्फत निर्यात केला जातो. 55 हजार रुपये टनाप्रमाणे त्यांना बाजारभाव मिळत असून, थोरात यांनी समाधान व्यक्त केले आहे.  मेहनत आणि कष्ट याला नक्कीच फळ मिळते. मात्र, अभ्यासपूर्ण शेती करणे गरजेचे आहे. पेरू विक्रीची योग्य वेळ आल्यावर कंपनी शेतात येऊन योग्यप्रकारे फळाला हाताळून पॅकिंग केली जात आहे. सध्या पेरूची ही बाग 17 महिन्यांची असून, 12 ते 15 वर्षे पुढे चालणार आहे. रोपांचा, ड्रिपचा खर्च पुढील काळात होणार नसून चांगले उत्पन्न मिळणार असल्याची अपेक्षा थोरात यांनी व्यक्त केली आहे.
 आपण सुरुवातीपासून एक पीक पद्धतीने शेती करतो. मात्र, सध्या शेतीमधील तंत्रज्ञान विकसित झाले असून, अभ्यासपूर्ण शेती करणे काळाची गरज आहे. सध्या शेतीमध्ये उच्चशिक्षित तरुण पिढीदेखील उतरत आहे. त्यामुळे आपल्याकडील अनुभव आणि कल्पनाशक्ती यांचा संगम केला तर नक्कीच शेती फायदेशीर होऊ शकते.
                                                                        -संजय थोरात, पेरू उत्पादक शेतकरी, वाळकी
पारंपरिक उसाची शेती करता करता काहीतरी वेगळा प्रयोग करावा म्हणून पेरूची बाग लावली. तीदेखील सेंद्रिय पद्धतीने करण्याचे ठरविले आणि त्यामध्ये यश आले, याचे खूप समाधान वाटते.
                                                         -आदित्य थोरात, उच्चशिक्षित पेरू उत्पादक शेतकरी, वाळकी

Back to top button