बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल अवमानजनक भाषा वापरली होती. शनिवारी (दि. 23) उपमुख्यमंत्री पवार हे बारामतीच्या दौर्यावर असताना एका संस्थेच्या वार्षिक सभेत सभासदाने हा विषय काढत पडळकर यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा दिला. त्यावर 'अलीकडील काळात वाचाळवीरांची संख्या वाढली आहे, तिकडे लक्ष देऊ नका,' असा सल्ला अजित पवार यांनी दिला. पडळकर यांच्याविरोधात दोन दिवसांपूर्वी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंबंधी माफी मागत असल्याचेही वक्तव्य केले होते. पवार यांनी मात्र या विषयाकडे सपशेल दुर्लक्ष केले.
संबंधित बातम्या :
दरम्यान, शनिवारी बारामतीत एका संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एका ज्येष्ठ सभासदाने हा विषय छेडला. पवार यांच्यासमोरच त्यांनी पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करीत पवार यांचा विकासपुरुष, असा उल्लेख केला. शिवाय पडळकर हे बारामतीला आल्यानंतर मी त्यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा दिला.
त्यावर पवार यांनी माईक हातात घेत, हे राजकीय व्यासपीठ नाही, याची जाणीव त्या सभासदाला करून दिली. इथे एका संस्थेची सर्वसाधारण सभा आहे. त्याविषयी बोला, असे म्हणाले. 'अलीकडील काळात वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे. पण, आपण अशा वाचाळवीरांकडे दुर्लक्ष करावे,' असे पवार म्हणाले.
हेही वाचा