Ajit Pawar News : अजित पवारांनी डीनचे टोचले कान..म्हणाले इतके उदारमतवादी राहून कसे चालले? | पुढारी

Ajit Pawar News : अजित पवारांनी डीनचे टोचले कान..म्हणाले इतके उदारमतवादी राहून कसे चालले?

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात बायोमेट्रीक हजेरी सुरु करा, जेणेकरून सर्वजण वेळेवर उपस्थित राहतील. वैद्यकीय अधिष्ठात्यांनी आजवर एकालाही उशीरा येण्यावरून मेमो दिलेला नाही. डीन तुम्ही इतके उदारमतवादी राहून कसे चालेल ? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्य रुग्ण कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
संबंधित बातम्या :
यावेळी बारामती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, प्रांताधिकारी वैभव नावडकर, अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, अधिष्ठाता डाॅ. चंद्रकांत म्हस्के,  उप अधिष्ठाता डॉ.अंजली शेटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.आमोल शिंदे, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे, डॉ. संतोष भोसले, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, बारामतीत चांगल्या प्रकारचे वैद्यकीय महाविद्यालय सुरु केले याचा आनंद आहे. इथे रोज स्वच्छता राखली जाते की आज मी येणार म्हणून सगळी तयारी केली आहे, असा सवाल करत पवार म्हणाले, समाजातील प्रत्येक घटकाला रुग्णालयाचा उपयोग झाला पाहिजे. येथे सर्व त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, यासाठी प्रयत्न व्हावेत. आम्ही मंत्रालयात गेलो तर तिथे आमची नोंद होते. इथे बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी घेतली पाहिजे. म्हणजे सगळे वेळेवर हजर राहतील. उशीरा आल्याबद्दल अद्याप एकदाही मेमो दिला गेला नाही, इतके उदारमतवादी राहून कसे चालेल.
कंत्राटी भरतीबद्दल सध्या अनेक गैरसमज निर्माण केले जात आहेत, वास्तविक मागील सरकारच्या काळातच हा निर्णय घेतला गेला होता, असे सांगून पवार म्हणाले, या विषयावरून तरुण-तरुणींना नाहक भडकावले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा वेळेत आणि माफक दरात मिळाव्यात यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे सांगून पवार म्हणाले,  सर्वसामान्य नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मूत्रपिंड प्रत्यारोपण व इतर गंभीर उपचार व शस्त्रक्रियांसाठी लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्षी रुपये 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचबरोबर इतर वैद्यकीय योजनाही राबविल्या जात आहेत. रुग्णालयातील आरोग्य विषयक सोयी सुविधांसाठी निधीची कमतरता कमी पडू देणार नाही. बाह्य रुग्ण कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना उत्तमातील उत्तम सेवा देवून चांगले कार्य घडावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मेंदूविकार तज्ज्ञ डॉ.चकोर व्होरा, अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. प्रसाद सुर्यवंशी, डॉ. ठाकूर डॉ.संतोष भोसले यांचा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हेही वाचा

Back to top button