पुणे; पुढारी वृत्तसेवा : वाबळेवाडी शाळेमधील अनियमिततेबाबतीत तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे हे विभागीय चौकशीतून दोषमुक्त झाले आहेत. वारे यांच्यावर झालेले कुठलेच आरोप सिद्ध होत नसल्याचा अहवाल विभागीय चौकशी समितीने
जिल्हा परिषदेला दिला. या अहवालानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी वारे दोषमुक्त असल्याचे आदेश दिले आहेत.
आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेेत वाबळेवाडीच्या शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक वारे यांना निलंबित करा अशी जोरदार मागणी करण्यात आली. त्या सभेत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी वारे यांचे निलंबित करू असे सभागृहाला सांगितले होते. त्यानुसार वारे यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशीची शिफारस केली होती.
दरम्यान, विभागीय चौकशी अधिकार्याने या संपूर्ण चौकशीत वारे यांच्यावर झालेले हलगर्जीपणा, कर्तव्यात कसूर व प्रशासकीय कामात निष्काळजीपणासह संपूर्ण आरोप सिद्ध होत नसल्याचे लेखी कळविले व चव्हाण यांनी वारे यांना वरील सर्व आरोपांतून दोषमुक्त करीत निलंबन कालावधी सेवाकाळ गृहीत धरत असल्याचा आदेश नुकताच जारी केला. दरम्यान, वारे यांची तालुका बदलून खेड तालुक्यातील जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेत बदली करण्यात आलेली आहे.
हेही वाचा